द कलर पर्पल (The Color Purple), 1985

अ‍ॅलिस वॉकर लिखित ‘द कलर पर्पल’ (The Color Purple) ही कादंबरी 1982 साली प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी अ‍ॅलिस वॉकर Alice Walker हिला साहित्यासाठी नामांकित असणारा ‘पुलित्झर पुरस्कार’ मिळाला. हा पुरस्कार मिळालेली अ‍ॅलिस ही पहिली काळी बाई (ब्लॅक वूमन) आहे.

कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर लगेच 3 वर्षांनी 1985 साली स्टीव्हन स्पिएलबर्ग Steven Spielberg (एक गोरा पुरुष) या प्रसिद्ध दिग्दर्शकाने  त्यावर त्याच नावाने चित्रपट बनवला.

ही कादंबरी जितकी लोकप्रिय ठरली, तेवढाच लोकप्रिय हा चित्रपटही ठरला. मात्र लोकप्रियतेबरोबरच ह्या दोन्ही कलाकृती वादाच्या आणि सेन्सॉरशिपच्या भोवऱ्यात देखील सापडल्या होत्या. त्याला कारण होते, त्यातील हिंसा, अत्याचार, समलिंगी संबंध, काळ्या पुरुषाचे हिंसक चित्रण इ. मात्र सर्व वाद आणि सेन्सॉरला मागे टाकत ही कलाकृती जगभर पोहचली, प्रेक्षक आणि वाचकांच्या पसंतीस उतरली आणि अनेक पुरस्कार आणि नामांकनेही मिळवली.

या चित्रपटात एका दृश्यात उल्लेख केल्याप्रमाणे ‘पर्पल’ म्हणजे जांभळा रंग हा बायबलमध्ये ‘प्रेमाची आस’ दर्शवणारा रंग आहे असे सांगितले आहे. गुलाबी आणि निळा यांना एकत्र आणणारा हा जांभळा रंग परंपरागत भिन्नलिंगी संबंधाच्या पलीकडे जाणारा आहे, त्यामुळे ‘द पर्पल कलर’ हे शीर्षक खूपच सूचक आहे.

ही गोष्ट ‘सिली’ नावाच्या एका अफ्रो-अमेरिकन महिलेची आहे. चित्रपटात अभिनेत्री ‘व्ह्यूपी गोल्डबर्ग’Whoopi Goldbergने ‘सिली’चं पात्र अत्यंत अप्रतिम साकारले आहे. 14 वर्षाची होईपर्यंत दोनदा गर्भवती राहिलेली सिली ते अगदी म्हातारपणाकडे झुकलेली सिली असा तिचा संपूर्ण जीवनप्रवास ह्या चित्रपटात आपल्याला दिसतो. लहानपणी खुद्द बापाकडून दोनवेळा गर्भवती राहिलेली सिलि ही त्याच्या लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराची बळी आहे. त्यानंतर लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडूनही तिला तिच्या बापाप्रमाणेच वागणूक मिळते.

पुरुषांकडून अतिशय हिंसक वागणूक मिळत असलेल्या आणि लहानपणापासून ‘कुरूप’ म्हणून हिणवल्या गेलेल्या  सिलीसाठी तिच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया जशी तिची बहीण, सून, नवऱ्याची मैत्रीण ह्यांच्याविषयी अपार प्रेम आणि जिव्हाळ्याचे नाते आहे.

कादंबरीइतके चित्रपटात अगदी स्पष्टपणे जरी समलिंगी संबंध दर्शवले नसतील, तरी सिलीची शारीरिक आणि मानसिक प्रेमाची आस ही पुरुषकेंद्री नसून स्रीकेंद्री आहे, हे स्पष्टपणे लक्षात येणारे आहे. लहानपणापासून अत्यंत जीवघेण्या मानसिक-शारीरिक त्रासातून जाऊनदेखील सिलीची मुक्तपणे जगण्याची आस वा उमेद शेवटपर्यंत टिकून आहे. 

या कादंबरी आणि चित्रपटातून काळ्या पुरुषाचे हिंसक, रानटी असे अगदी रुढीवादी चित्रण (Stereotypical narration) केले आहे, अशी टीका काळ्या लोकांकडून करण्यात येते. त्यात हा चित्रपट एका गोऱ्या पुरुषाने बनवला असल्याकारणाने ही टीका अधिक तीव्र झालेली दिसते. ‘गोऱ्या पुरुषांना आमच्या आयुष्यावर असा चित्रपट बनवण्याचा कुणी हक्क दिला’, अशी टीका काळ्या पुरुषांनी केली. याविषयी एका मुलाखतीत भाष्य करताना अभिनेत्री ह्युपी गोल्डबर्ग म्हणते, “एका गोऱ्या पुरुषाने यावर सिनेमा बनवला, ही जर समस्या असेल, तर मग आपण का नाही बनवत?” इथे आपण ही कादंबरी एका काळ्या बाईने लिहिली आहे, ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच समाजात काळ्या पुरुषांचे रुढीवादी चित्रणही प्रचलित आहे, हे देखील तितकेच वास्तव आहे; त्यामुळे ह्या बाबी विचारत घेणे गरजेचे आहे.

सिनेमातील अनेक दृश्ये, अनेक पात्रे आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहतील असे आहेत. त्यातील ‘सोफिया’चे पात्र आणि तिची स्टोरी आपल्याला आतून हलवून टाकणारी आहे. सोफिया ही सिलीच्या सावत्र मुलाची बायको आहे. जाड, बुटकी, काळी सोफिया सुरुवातीला आपल्याला नवऱ्यावर हुकूमत चालवणारी वर्चस्ववादी (dominant) बाई वाटू शकते. पण नंतर काही काळातच लक्षात येते, की हा dominance नसून तिला लहानपणापासून आलेल्या अनुभवातून तयार झालेला तिचा स्वाभिमान आहे.

पण अशा ह्या स्वाभिमानी सोफियाची तिच्या सामाजिक/आर्थिक/राजकिय स्थानामुळे होणारी दुरावस्था आपल्याला आतून हादरवून टाकते. एका गोऱ्या स्त्रीची नोकर बनण्यास दिलेल्या नकारामुळे तिला तब्बल आठ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होते. आणि मग तुरुंगातून बाहेर आल्यावर स्वाभिमान हरवलेली सोफिया गपगुमानपणे त्या गोऱ्या बाईची नोकरी स्वीकारते. 

1980च्या दशकात जेव्हा कादंबरी आणि चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी अमेरिकेत देखील समलैंगिक संबंधां(homosexual relation)कडे अनैतिक/पाप अशा स्वरूपात पाहिलं जात होतं. त्यामुळे त्यांना झालेला विरोध लक्षात येणारा आहे. भिन्नलिंगी संबंधां(heterosexual relation)ना आव्हान देणारी, प्रेमाचे नवीन पदर उलगडून दाखवणारी, त्याचवेळी जगण्याची उमेद जिवंत ठेवणारी ही कलाकृती आवर्जून पहावी अशीच आहे.

(‘The Color Purple movie’ by Steven Spielberg)

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *