‘फकिरा’ Fakira (1959) – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ‘फकिरा‘ (Fakira) ही प्रसिद्ध कादंबरी 1959 साली प्रकाशित झाली आहे. ही कादंबरी अण्णा भाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. कादंबरीला वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना आहे. राज्य सरकारने प्रथम पारितोषिक देऊन ‘फकिरा’ कादंबरीला गौरवले आहे. गावकुसाबाहेरचं गरिबीचं जिणं वाट्याला आलेल्या वंचित समुहाच्या एका नायकाची ही शौर्यगाथा आहे.
कादंबरीच्या सुरुवातीला अण्णा भाऊंनी थोडक्यात आपली कैफियत मांडली आहे. फकिरा जेव्हा इंग्रजांना शरण गेला, तेव्हा अण्णा भाऊ पाळण्यात होते. पण तरी फकिराशी अण्णा भाऊंचा एक सौहार्दाचा धागा होता, तोच त्यांनी या कैफियतमध्ये मांडला आहे. ज्या रात्री अण्णा भाऊंचा जन्म झाला, तेव्हा फकिराने इंग्रजांचा खजिना लुटला होता. वाटेत जाताना त्याने अण्णा भाऊंच्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घराचं दार ठोठावलं होतं. अण्णा भाऊंच्या जन्माची वार्ता समजल्यावर लुटीच्या खजिन्यातल्या दोन ओंजळी सुरती रुपये देऊन ‘बाळ-बाळंतणीची काळजी घ्या’, असं सांगून घोड्याला टाच मारून तो निघून गेला होता. याच दोन ओंजळी सुरती रुपयांची पहिली घुटी अण्णा भाऊंनी खाल्ली होती. बालपणापासून अण्णा भाऊंनी आसपासच्या डोंगरदऱ्यात फकिराच्या कर्तृत्वाच्या ज्या गोष्टी ऐकल्या, त्या मनात साठवल्या होत्या. अण्णा भाऊंनी मराठी भाषेचे भांडार लुटून, ते ‘फकिरा’वर उधळून त्या दोन ओंजळीची फेड करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या कैफियतमध्ये नमूद केले आहे.
पिढ्यान् पिढ्या मांगवाडा, महारवाडा गावकुसाबाहेरचं दरिद्री जिणं जगत आला आहे. त्याच मांगवाड्यातलं जिणं फकिरा जगाला होता. तिथल्या लोकांच्या हितापायी, त्यांच्या कल्याणापायी त्यानं आपलं अवघं आयुष्य वेचलं होतं. स्वतः अण्णा भाऊ साठेंनी देखील तेच जगणं अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या लिखाणाला केवळ प्रतिभेचीच नाही तर वास्तवाची आणि अनुभवाची जोड मिळालेली आहे. डॉ. सदानंद मोरे यांनी फकिरा कादंबरीविषयी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,
“वास्तव, अनुभव आणि प्रतिभा असा त्रिवेणी संगम झाल्यामुळे किती श्रेष्ठ दर्जाची कलाकृती निर्माण होऊ शकते, याचे अण्णा भाऊ साठे यांची फकिरा ही कादंबरी एक ठसठशीत उदाहरण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ही कृती अर्पण करून अण्णा भाऊ साठे यांनी मोठेच औचित्य साधले आहे. स्वकियांची सावकारशाही आणि परकियांची साम्राज्यशाही यांना फकिराने दिलेली झुंज 1942च्या प्रतिसरकारशी नाते सांगणारी आहे, यात संशय नाही. समग्र गावगाडा उभा करण्याचे कसब अण्णा भाऊ साठे यांच्याइतके कोणालाच साधलेले नाही.”
जत्रेचा मान आपल्या गावाला मिळून आपल्या गावाची शान वाढावी म्हणून फकिराच्या वडिलांनी म्हणजे राणोजीने आपला जीव गमावला होता. फकिरा आपल्या वडिलांसारखाच धाडसी आणि शूरवीर होता. शेजारच्या गावच्या बापू खोतानं आगळीक करून राणोजीला मारला होता. त्यावेळी फकिरा अगदी लहान होता, पण आपल्या वडिलांची धाडसी, करारी वृत्ती त्याने हुबेहूब उचलली होती. राणोजीने गावासाठी प्राण त्यागला होता. त्याच्या त्यागाने गावाला जत्रेचा मान मिळून गावात आनंद आणि चैतन्य संचारलं होतं. राणोजीच्या पावलावर पाऊल टाकत फकिरा देखील जीवाची पर्वा न करता जत्रेच्या दिवशी जोगतीचं संरक्षण करत होता. गावासाठी प्राण त्यागला काय, किंवा जीवावर उदार होऊन गावच्या प्रतिष्ठेचं संरक्षण केलं काय, त्यामुळं मांगवड्यातल्या अन् महारवाड्यातल्या कुटुंबांची गरिबी काही हटत नव्हती. जिंदगीभर टाचा घासत जगणंच इथल्या समाजव्यवस्थेनं त्यांच्यावर लादलेलं आहे. पण वाट्याला आलेलं उपेक्षिताचं दरिद्री जिणं मुकाटपणे स्वीकारणाऱ्यांतला फकिरा नव्हता. हक्कांसाठी लढणारा, अन्यायाविरुध्द बंड करणारा अन् पोटासाठी झगडणारा असा हा तडफदार, उमदा लढवय्या होता.
उत्पन्नाची साधनं हाती नसणाऱ्या गावकुसाबाहेरच्या ह्या भूमिहीन लोकांना पोटाची आग विझवणयासाठी नाईलाजाने बऱ्याचदा जमीनदारांच्या शेतातून धान्याची, भाजीपाल्याची तर कधी भुरटी चोरी करण्याची वेळ यायची. त्यांची मजबुरी समजून न घेता तसेच इथली सामाजिक आणि आर्थिक विषमता कशी काम करते हे जाणून न घेता इंग्रज सरकारने अशा मांग-महारवाड्यातल्या चोरांना आणि इतर भटक्या विमुक्त जमातींना सरसकट अटक करून ‘गुन्हेगार जमाती’ ठरवून तडीपार करण्याचा क्रूर कायदा तयार केला होता. अशा कायद्यामुळे फकिराच्या वस्तीतल्या सावळ्याला तारुण्याची कितीतरी वर्षे दूरच्या प्रदेशात तडीपार म्हणून राहण्याची वेळ आली होती. अशा क्रूर अन्याय्य कायद्यामुळे फकिरा चरफडत होता. असलं लाजिरवाणं उपेक्षितांचं जगणं त्याला नको वाटत होतं. शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून मेलेलं कितीतरी चांगलं, असं त्याला वाटे.
दुष्काळ आणि महामारीने जेव्हा एकाचवेळी झडप घातली त्या काळात तर मांगवाडा, महारवाडा अन्न-अन्न म्हणून मरायला लागला, तेव्हा गावाने देखील मदत करण्यापासून हात वर केले. अशा काळात जमीनदार लोकांची घरं धान्यांच्या कनग्यांनी भरलेली होती. धान्य पडून सडत होतं. असं असलं तरी गोरगरिबांच्या पदरी दोन घास देण्याची त्यांची तयारी नव्हती. ही सर्व परिस्थिती फकिरा डोळे बंद करून नजरेआड करू शकत नव्हता. आपल्या नजरेसमोर आपली माणसं रोज मरत असताना आपण काहीच न करणं, फकिराच्या लढाऊ प्रवृत्तीला शोभणारं नव्हतं. वस्तीवरच्या आपल्या साथीदारांना बरोबर घेऊन फकिरा शेजारच्या गावच्या बड्या जमीनदाराच्या वाड्यातून धान्य लुटून आणून आपल्या लोकांमध्ये वाटतो. ह्या माणुसकीची सजा म्हणून त्यानंतरच्या काळात फकिरा आणि त्याच्या साथीदारांच्या पाठी डोंगरदऱ्यातील जीवघेणी वणवण सुरू होते.
आपल्याच समाजातले बडे जमीनदार, सावकार, परकीय इंग्रज सत्ता, त्यांच्या पदरी काम करणारे आपले देशी गुलाम अधिकारी हे सर्व फकिरा आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी जीवाचे रान करत होते. शर्थीचे प्रयत्न करूनही फकिरा हाती लागत नव्हता. फकिराने त्यांना जेरीस आणले होते. त्यावर कडी म्हणजे फकिराने एका गावातील इंग्रजी सत्तेचा खजिना लुटला. त्यानंतर फकिरा आणि त्याच्या साथीदारांचे काय होते? फकिरा आणि साथीदारांच्या माघारी त्यांच्या बायकापोरांचे काय होते? हे जाणून घेण्यासाठी फकिरा कादंबरी नक्की वाचा. अण्णा भाऊ साठे यांचं ओघावतं लिखाण वाचकाला खिळवून ठेवल्याशिवाय राहत नाही. आपला जाज्वल्य, लढाऊ बाणा असणारा इतिहास वंचित समूहाने विसरता कामा नये. अण्णा भाऊंची लेखणी वंचित समुहास सदैव प्रेरणा देण्याचे काम करत राहील यात शंका नाही. वाचकांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ‘फकिरा’ ही कादंबरी आवर्जून वाचायलाच हवी.