भारताचे मिल्कमॅन ‘वर्गीस कुरियन’
सहकार तत्वावर दुग्धव्यवसायाला चालना देऊन भारताला जगातील सर्वाधिक दुग्धउत्पादक देश बनवण्यात ‘वर्गीस कुरियन’ (Verghese Kurien) यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. म्हणूनच ‘भारताचे मिल्कमॅन’ (Milkman of India) म्हणून त्यांची खास ओळख आहे. डॉ. कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर,1921 रोजी केरळमधील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. सहकार तत्वावर चालणारा सर्वाधिक मोठा ‘अमूल ब्रँड’ (Amul brand) विकसित करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. दूध आणि दुधाचे इतर प्रोड्युक्ट्स उत्पादित करून अमूल ब्रँड भारतातील सर्वाधिक पसंतीस उतरलेला ‘टेस्ट ऑफ इंडिया’ ब्रँड झालेला आहे, याचे सर्व श्रेय वर्गीस कुरियन यांनाच द्यावे लागेल. वर्गीस कुरियन ‘भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक’ (Father of the White Revolution) म्हणूनही ओळखले जातात.
स्वातंत्र्यपूर्व काळात गुजरातमधील कैरा जिल्ह्यातील शेतकरी पेस्टनजी एडलजी ह्या पारशी उद्योजकाच्या ‘पोल्सन’ डेअरीकडून होणाऱ्या शोषणाला वैतागलेले होते. दुधउत्पादक शेतकऱ्यांची या शोषणातून सुटका करण्याच्या कामी वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई आणि त्रिभुवन दास प्रयत्न करत असतानाच, गुजरातमधील ‘आनंद’ या छोट्या शहरात नोकरीनिमित्त आलेले वर्गीस कुरियन हे देखील या दुधउत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या मदतकार्यात सहभागी झाले.
वर्गीस कुरियन यांची कल्पकता आणि नाविन्यता हेरून लवकरच त्रिभुवन दास ह्यांनी त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. गुजरातमधील दुधउत्पादक शेतकऱ्यांची पोल्सन डेअरीच्या जाचातून सुटका करत, कुरियन यांनी गुजरात सहकारी दुग्ध पणन महासंघाची (जीसीएमएमएफ) स्थापना केली. 2007 पर्यंत सलग 34 वर्षे ते या महासंघाच्या अध्यक्षपदी होते.
ही संस्था अमूल’ डेअरी उत्पादनांची निर्मिती करते. सारे जग गाईच्या दुधापासून बनवलेली भुकटी वापरत होते; तर भारतात विशेषतः उत्तर व मध्य भारतात म्हशी पालनाचे प्रमाण मोठे आहे. ही बाब जाणून डॉ. कुरियन यांनी म्हशीच्या दुधाची भुकटी तयार करण्याची किमया साधली. सहकार तत्वावर उभारलेल्या आणि क्वालिटीच्या जोरावर ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘अमूल’ डेअरी ब्रँडची आणि ही कल्पना वास्तवात उतरवणारे ‘वर्गीस कुरियन’ यांची कायम विशेष दखल घेतली जाईल, यात शंका नाही.