Wrestlers Protest : महिला कुस्तीपटू खेळाडू आज स्वतःच्याच देशात हरल्या…
आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकून जगभरात भारताची मान उंचावणाऱ्या महिला कुस्तीपटू खेळाडू आज स्वतःच्याच देशात मात्र हरल्या आहेत. गेले महिनाभर दिल्लीच्या तळपत्या उन्हात भारतीय महिला कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन (Wrestlers Protest) चालू आहे. आज देशात एकीकडे लोकशाहीचे प्रतिक असणाऱ्या भव्यदिव्य नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, तर दुसरीकडे मात्र सरकारने लोकशाही मूल्यांची पायमल्ली करत या महिला खेळाडूंचे आंदोलन निर्दयीपणे चिरडून टाकले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधील पदकं जिंकून आल्यानंतर या खेळाडूंना पंतप्रधान मोदींनी चहापानासाठी खास निमंत्रित केलं होतं. आज मात्र या खेळाडूंची ‘मन की बात’ ऐकायला पंतप्रधानांना वेळ नाही. भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे अध्यक्ष आणि भाजपचे लोकसभा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध भारतीय महिला कुस्ती खेळाडूंनी लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुठलीही कारवाई होत नसल्याने त्याविरोधात या खेळाडूंनी जानेवारी महिन्यातच आंदोलन सुरू केले होते. सरकारकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकर्त्यांनी माघार घेतली होती. मात्र पुढील 3 महिन्यांत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई तर दूरच, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून निलंबन देखील करण्यात आलेले नाही. एकीकडे गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचारांचे आरोप असताना देखील हा व्यक्ती उजळ माथ्याने समाजात फिरतोय. तर दुसरीकडे देशाचं नाव जगात गाजवणाऱ्या ह्या पदकविजेत्या महिला खेळाडू न्यायासाठी झगडत आहेत.
23 एप्रिलपासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानात महिला कुस्तीपटू खेळाडू साक्षी मलिक, विनेश फोगाट, पुरुष कुस्तीपटू बजरंग पुनिया हे इतर खेळाडूंच्या साथीने आंदोलन करत आहेत. अन्याय, अत्याचाराविरुद्ध लोकशाहीमार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार आहे. याच अधिकाराचा वापर करत ह्या महिला खेळाडू हे आंदोलन करत होत्या. मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात सरकारने अजिबात स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळेच 28 मे च्या रविवारी नव्या संसद भवनच्या जवळ ‘महिला सन्मान महापंचायत’ आयोजित करण्याची घोषणा या आंदोलनकर्त्या खेळाडूंनी केली होती. त्याला पाठिंबा देण्यासाठी पंजाब हरयाणा येथील काही शेतकरी गट येणार होते, मात्र त्या गटांना दिल्लीकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले. तसेच रविवारी आंदोलकर्त्यां खेळाडूंना महिला सन्मान महापंचायत घेण्यापासून पोलिसी बळाचा वापर करत रोखले गेले. पोलिस यंत्रणेने या खेळाडूंना जबरदस्तीने फरफटत नेत अटक केले.
पोलिसांनी पदकविजेत्या खेळाडूंना ज्याप्रकारे बळाचा वापर करत अटक केली ती आपल्या लोकशाहीवादी देशासाठी अत्यंत निराशाजनक बाब आहे. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आंदोलनकर्ती खेळाडू साक्षी मलिक हिने, “कुठलं सरकार आपल्या चॅम्पियन्ससोबत असा व्यवहार करतं का? आम्ही काय गुन्हा केला आहे?” असे ट्विट केले आहे. या खेळाडूंना सोशल मीडियावर सर्व स्तरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे.
लोकशाहीमार्गाने चाललेली आंदोलनं चिरडून टाकण्याचा हा पॅटर्न रूढ होऊ पाहतोय. देशाचे संसद भवन किती भव्यदिव्य आहे ही बाब गौण असून, तिथे देशातल्या नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे जतन आणि संवर्धन कसे होते हे अधिक महत्वाचे आहे. संसद भवनाचा आकार वाढवला जात असताना त्याची भव्यदिव्यता पाहून नागरिकांचा उर अभिमानाने भरून येणे स्वाभाविकच आहे. पण इथे जर संवैधानिक मूल्येच आकुंचन पावली जात असतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.
Wrestlers Protest
This is how our champions are being treated. The world is watching us! #WrestlersProtest pic.twitter.com/rjrZvgAlSO
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) May 28, 2023