जागतिक पातळीवर भारताची मान उंचावणाऱ्या महिला खेळाडू न्यायाच्या प्रतीक्षेत

भारतीय महिला कुस्ती खेळाडूंचा जंतर मंतर मैदानावरील आंदोलनाचा आज सलग तेरावा दिवस. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशमधील महत्वाचे नेते बृजभूषण सिंह यांच्यावर ह्या महिला कुस्ती खेळाडूंनी लैंगिक अत्याचाराचे आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. त्यासाठी ह्या महिला खेळाडूंनी जानेवारी महिन्यातच आंदोलन केले होते. मात्र त्यावेळी आरोपीवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यामुळे खेळाडूंनी आंदोलनातून माघार घेतली होती. सरकारकडून आश्वासन मिळून 3 महिने उलटून गेल्यानंतरही बृजभूषण सिंह यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे कुस्ती खेळाडूंनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धार या खेळाडूंनी व्यक्त केला आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक यांच्या साथीला पुरुष पैलवान बजरंग पूनिया यांच्या समवेत अनेक पुरुष खेळाडू देखील आंदोलनात सहभागी झाले आहे.

आंदोलनकर्त्या महिला खेळाडूंचे म्हणणे काय आहे? –

विनेश फोगाट, साक्षी मलिक त्याबरोबर इतर आंदोलकर्त्या महीला खेळाडूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विनेश फोगाट हिने पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, “प्रशिक्षक महिलांना त्रास देत आहेत. महासंघाचे काही आवडीचे प्रशिक्षक तर महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंना त्रास देतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे.” त्याबरोबरच तिने पुढे असंही म्हटलं आहे की, “माझा खूप मानसिक छळ करण्यात आला, मी एकेकाळी आत्महत्या करण्याचा विचार करत होते. दररोज माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. ते आमच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि त्रास देतात. ते आमचं शोषण करत आहेत. ऑलिम्पिक खेळण्यासाठी जातो त्यावेळी आमच्याकडे ना फिजिओ असतो ना प्रशिक्षक. आम्ही आवाज उठवायचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला धमकावणं
सुरू केलं.”

काय आहेत भारतातली दिग्गज खेळाडूंच्या या आंदोलनाविषयीच्या प्रतिक्रिया? – जंतर मंतर मैदानावर हे आंदोलन सुरू झाल्यापासून विविध क्षेत्रातून खेळाडूंच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा ह्याने पत्रक काढून कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. या पत्रकामध्ये नीरज चोप्रा याने म्हटलंय की, “न्यायासाठी खेळाडूंना रस्त्यावर उतरावं लागणं ही दुःखद बाब आहे. देशाला अभिमानास्पद अशी कामगिरी करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. देश म्हणून आपण प्रत्येक खेळाडूच्या प्रामाणिकतेचं आणि प्रतिष्ठेचं संरक्षण केलं पाहिजे. जे काही घडतंय ते कधीच घडायला नको होतं. हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. याकडे अत्यंत निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे पाहायला हवं. संबंधित प्राधिकारणाने यावर ताततडीनं कारवाई करत, न्याय देण्याचा विश्वास दिला पाहिजे.” तसेच माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी सोशल मीडियावर आंदोलनकर्त्या खेळाडूंचा फोटो शेअर करत, “यांना न्याय मिळेल का?” असा प्रश्न विचारत आंदोलनकर्त्या खेळाडूंची पाठराखण केली आहे. राज्यसभा खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी मात्र ह्या आंदोलनाविषयी नकारात्मक सूर आळवला आहे. “खेळाडूंनी अशा प्रकारे रस्त्यावर आंदोलन करणं ही अनुशासनहीनता आहे, त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे.” पदकविजेती माजी वेगवान धावपटू आणि त्यातल्या त्यात एक महिला खेळाडू असून देखील अशाप्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केल्याने पीटी उषा यांच्यावर समाज माध्यमांमधून बरीच टीका झाली.

या आरोपांविषयी बृजभूषण सिंह यांचं म्हणणं काय?

बृजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशमधील भाजपचे मोठे नेते आहेत, तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत. महिला कुस्ती खेळाडूंनी केलेल्या या आरोपांनंतर बृजभूषण सिंह यांनी तात्काळ माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्यावर झालेल्या सर्व आरोपांना त्यांनी फेटाळून लावले आहे.

ANI वृत्तसंस्थेशी बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले, “दिल्लीत कुस्तीपटूंनी महासंघाविरुद्ध धरणे आंदोलन पुकारल्याची माहिती मिळताच मी तत्काळ आलो. माझ्यावर सगळ्यात मोठा आरोप विनेशने लावला आहे. महासंघाच्या अध्यक्षांनी या खेळाडूचं शोषण झालं, असं म्हणणारा कुणी खेळाडू समोर आला आहे का?” पुढे म्हणाले, “लैंगिक शोषणाचा कोणताही प्रकार झालेला नाही. तसं काही घडलं असल्यास मी स्वतःला फाशी लावून घेईन.”

भारत सरकारने जानेवारी महिन्यात आंदोनकर्त्या खेळाडूंना आश्वासन देऊनही बृजभूषण सिंह यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. समाज माध्यमांमधून ह्या आंदोलनाला आणि महिला कुस्ती खेळाडूंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *