मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern), 2018
प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern)हा सिनेमा नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला आहे. ओंकार भूतकर, मोहन जोशी, सविता मालपेकर, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सुरेश विश्वकर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा पुणे शहर आणि शहराच्या जवळ असणाऱ्या मुळशी गावाच्याभोवती फिरताना दिसतो. गेल्या काही दशकात पुण्याची ‘विद्येचं माहेरघर’ ही ओळख धूसर होऊन, नव्याने वसवू पाहणारं ‘आयटी हब’ अशी ओळख रूढ होत आहे.
असे आयटी हब उभे राहत असताना, पुणे शहराच्या अवतीभवतीचे अनेक गावे या शहरीकरणाच्या विळख्यात आली आहेत. बिल्डर्सना जमीन विकून काही काळाने अगदी देशोधडीला लागलेले शेतकरी आणि गुन्हेगारी विश्वाच्या विळख्यात अडकलेली शेतकऱ्यांची पोरं यांची दाहक कथा प्रवीण तरडे यांनी या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर मांडली आहे. पुण्याचे शहरीकरण अवतीभवती विस्तारत असताना सर्वात जास्त जमिनी गेल्या, त्या मुळशीकरांच्या आणि तीच गत मग इतर गावच्या शेतकऱ्यांची देखील झाली, तर त्या प्रातिनिधिक अर्थाने ‘मुळशी पॅटर्न’ हे नाव अगदी साजेशे असेच आहे.
चित्रपटात मुळशी गावचे मोठे जमीनदार आणि पाटील असणारे सखाराम पाटील (मोहन जोशी) हे बिल्डर्सना जमिनी विकतात आणि थोड्याच कालावधीत पैसे संपल्यावर गावात अगदी वॉचमन म्हणून काम करण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यामुळे गरिबीने आणि बेकारीने हैराण असलेला त्यांचा मुलगा राहुल्या (ओंकार भूतकर) या येताजाता वडिलांना जमिनी विकल्याची टोचणी देत असतो. पुढे काही वाईट घटनांमुळे ह्या कुटुंबाला पुण्यातील एका चाळीत येऊन राहण्याची वेळ येते. पोटाची खळगी भागवण्यासाठी एकेकाळचे गावचे पाटील असणारे सखाराम पाटील यांना भाजी मार्केटमध्ये अगदी हमलाचे काम करण्याची वेळ येते, तर त्यांच्या बायकोला आणि मुलीला लोकांच्या घरी धुण्या-भांड्याचे काम करण्याची वेळ येते.
एकेकाळची श्रीमंती आणि आता आलेली ही टोकाची गरिबी, मानहानी याने उद्विग्न झालेला राहुल्या गुन्हेगारी जगताकडे वळतो आणि ‘लँडमाफिया’ बनून इतर शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डर्सच्या घशात घालणारा भाई बनतो. फ्लॅशबॅकमध्ये सुरू होणाऱ्या सिनेमाच्या सुरुवातीला स्वतःचा जीव वाचवत पळणारा राहुल्या सिनेमाच्या शेवटपर्यंत पळताना दाखवला आहे आणि मध्ये येणाऱ्या अनेक वळणांवर सिनेमाची कथा उलगडत जाते. जे गुन्हेगारी जग त्याला काही काळासाठी श्रीमंत भाई बनवते, तेच त्याचा घात करून शेवट देखील करते. अशी ही सिनेमाची वरकरणी कथा आहे.
ही गोष्ट जरी एका भाई बनलेल्या राहुल्याची आणि जमिनी विकून कंगाल झालेल्या त्याच्या शेतकरी बापाची असली, तरी ती आपल्या समाजातील अनेक शेतकऱ्यांची आहे. भारताने १९९१ साली नवउदारमतवादी धोरण स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात परदेशी आणि देशी खाजगी कंपन्या आणि भांडवलदार बिजनेससाठी मोठी गुंतवणूक करत आहेत. त्यातून मोठ्या शहरांभोवतीच्या अधिक जमीन विकत घेऊन तिथे कंपन्या उभारल्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत आहे. या वाढत्या शहरीकरणातून तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांवर आणि शेतमजुरांवर अतिशय दूरगामी परिणाम होत आहेत.
जमिनी विकून एकरकमी पैसे तर मिळतात, पण ते आले तसे संपूनही जातात. एकरकमी भरमसाठ पैसे आल्यानंतर काही काळ त्यांची तरुण पोरं ऐश करतात, गाड्या उडवतात, व्यसनं करतात आणि काही कालावधीतच कंगाल होतात. त्यानंतर त्यांची अगदी दारुण वाईट अवस्था होते. या परिस्थितीतचं अतिशय हृदयद्रावक चित्रण लेखक/दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दाखवलं आहे. चित्रपटाचे संवाद देखील त्यांनीच लिहिले आहेत, जे अतिशय दमदार आणि टायमिंग साधणारे आहेत. महेश लिमये यांचं छायाचित्रण अतिशय उत्कृष्ट आहे.