शाहू महाराजांचे समाजकल्याण धोरण
राजेशाहीचा काळ आठवायचा म्हटलं की, सर्वप्रथम डोळ्यांसमोर उभा राहतो तो राजघराण्यांतील मदमस्तपणा, मुजोरी, स्वार्थ, सत्तेची लालसा आणि त्यासाठीचा जीवघेणा संघर्ष. बहुतांश वेळा इतिहासाच्या पानांतून असो वा ऐतिहासिक कादंबऱ्यातून याच गोष्टींभोवतीच्या कथा चवीने चघळलेल्या दिसतात. कदाचित याचे कारण बहुदा हेच असावे की राजेशाहीतील बहुतांश राजांची धोरणे हे लोककेंद्री नसून केवळ सत्ताकेंद्री होती. मात्र तरी काही बोटांवर मोजता येणारी अशी उदाहरणे आहेत जे त्यांच्या समाजाभिमुख कार्याने केवळ राजा नव्हे तर लोकराजा म्हणून समाजमनात मानाने विराजमान झाले आणि ज्या-ज्या वेळी ह्या लोकराजांचा विचार केला जातो, त्या-त्या वेळी केवळ त्या राजाचाच नव्हे तर ओघानेच तत्कालीन अवघ्या समाजाच्याच उत्कर्षाचा इतिहास सोनेरी अक्षरात लिहिला जातो. अशा लोकराजांच्या उदाहरणांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे (Rajarshi Shahu Maharaj)स्थान अगदी वरचे आहे. बहुआयामी, दूरदर्शी, समताप्रिय, आधुनिकतावादी, कनवाळू अशा गुणवैशिष्टयांनी संपन्न अशा ह्या लोकराजाच्या लोकाभिमुख कार्याचा पसारा म्हणजे अक्षरशः सोन्याने भरलेली खाण आहे; कितीही खणले तरी हाती केवळ सोनेच लागावे आणि त्याच्या तेजाने आपले डोळे दिपून जावे.
इ.स. 1708 मध्ये कोल्हापूर या स्वतंत्र राज्याची स्थापना झाली होती. 1883 मध्ये राजे चौथे शिवाजी यांना वेडसर ठरवून इंग्रजांनी त्यांना अटक करून कपटाने मारले. त्यांच्या पत्नी आनंदीबाई निपुत्रिक असल्यामुळे राज्यकारभार चालवण्यासाठी कागलच्या घाटगे घराण्यातील जयसिंगराव घाटगे यांचे पुत्र यशवंतराव यांना 1884 मध्ये त्यांनी दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू महाराज असे ठेवले. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी राधाबाई आणि जयसिंगराव घाटगे यांच्या पोटी झाला होता. मात्र जन्मानंतर अवघ्या 3 वर्षातच त्यांच्या या जन्मदात्या आईचा आणि त्यानंतर 9 वर्षांनी वडिलांचा मृत्यू झाला.
1885 पासून राजकोट येथील राजपुत्रांसाठी असलेल्या महाविद्यालयात त्यांचे शिक्षण सुरु झाले. प्रिन्सिपल मॅकनॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली 1889 पर्यंत त्यांनी राजकोट येथील शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण प्रोफेसर स्टुअर्ट फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली 1890-94 या कालावधीत धारवाड येथे पूर्ण केले. त्याठिकाणी त्यांनी इंग्रजी भाषा, राज्य कारभार व जगाचा इतिहास या विषयांचा अभ्यास केला. यादरम्यान प्रोफेसर फ्रेजर आणि महाराज यांच्यात अगदी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. राज्यकारभाराची धुरा सांभाळण्यापूर्वी शिक्षणाबरोबरच त्याला अनुभवाची जोड मिळणेही तितकेच आवश्यक आहे, असे प्रोफेसरांचे म्हणणे होते. त्यासाठी शाहू महाराजांनी भारत भ्रमंती करावी या उद्देशाने त्यांनी राजांसाठी विविध सहलींचे आयोजन केले होते, त्यातील दोन उत्तर भारतात तर एक दक्षिण भारत आणि श्रीलंका येथे आयोजित केली होती.
यातील पहिली सहल ही प्रथम नाशिक येथील पंचवटी येथे गेली कारण त्या स्थानाविषयी शाहुराजांना श्रद्धा होती. मात्र तेथील भटभिक्षुक, पंडे पुजारी, पुरोहित यांचे प्रस्थ आणि शाहूराजांकडून विधी करून घेऊन मलिदा लाटण्यासाठी त्या पंड्यांमध्ये चाललेली हमरीतुमरी पाहून शाहुराजांना त्याची घृणा वाटली आणि त्यांच्या श्रद्धाळू मनावर पहिला आघात झाला. उर्वरित सहलींमधील भारत भ्रमंतीतून देशाची विशालता, प्राचीनता, विविधता यांनी शाहूराजांचे अनुभवविश्व समृद्ध केले.
आधुनिक शिक्षण आणि भ्रमंतीतून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी यांच्या सहाय्याने राज्यकारभाराची धुरा स्वीकारण्यास शाहूराजे सिद्ध झाले. 2 एप्रिल 1894 रोजी कोल्हापूरच्या गादीचे अधिकार हाती घेऊन शाहू महाराज खऱ्या अर्थाने कोल्हापूरचे छत्रपती झाले. राज्यकारभार हाती घेताच तात्काळ महाराजांनी आपल्या रयतेस लोककल्याणाची हमी देणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी सर्व प्रजाजनांना असे जाहीर केले की, “आमचे प्रजाजन सदासुखी व संतुष्ट असावेत. त्यांच्या हिताची एकसारखी अभिवृद्धी होत जावी व आमच्या संस्थानाचा सर्व बाजूंनी अभ्युदय व्हावा, अशी आमची उत्कट इच्छा आहे. यासाठी सर्वांच्या उज्ज्वल राजनिष्ठेची व सहकार्याची आम्हांस आवश्यकता आहे.” या जाहीरनाम्यातून शाहू महाराजांची समाजाभिमुख कार्याची दिशा अगदी स्पष्टपणे दिसून येते. मात्र शाहूराजे केवळ बोलणाऱ्यांतले नव्हते तर प्रत्यक्ष कृती करणारे होते, याची प्रचिती त्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकालात पदोपदी दिली.
राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या 1-2 वर्षातच राज्यावर दुष्काळ आणि प्लेगच्या साथीचे सावट पसरले. 1896 सालच्या ह्या दुष्काळाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. पाण्यासाठी आणि अन्नासाठी प्रजा दीनवाणी झाली होती. परंतु शाहूराजे धीरोदात्तपणे या संकटाला सामोरे गेले. अविश्रांत कष्ट घेऊन आपल्या राज्याचा त्यांनी दौरा केला, प्रजेच्या अन्नपाण्याची सोय केली. करवीर संस्थानात एकही भूकबळी जाऊ दिला नाही वा कोणालाही परागंदा होऊ दिले नाही. निराधारांसाठी आश्रम सुरु केले, लहान मुलांसाठी तात्पुरते बालकालये सुरु केली. शेतकऱ्यांना कर्जे दिली व शेतसाऱ्यात सूट दिली, जनावरांच्या चारापाण्याची सोय केली, सावकारांच्या ताब्यातून शेतकऱ्यांच्या जमिनी सोडवल्या, असे नानाविध उपाय करून दुष्काळाची झळ प्रजेला बसणार नाही याची काळजी घेतली.
त्याचवर्षी मुंबईत प्लेगची साथ आली होती; हा प्लेग एक दिवस कोल्हापूर संस्थानातही दाखल होईल ह्या विचाराने त्यांनी पूर्वखबरदारीचे उपाय अवलंबण्यास सुरुवात केली. दुष्काळाचा पाहणी दौरा चालू असतानाच गावोगावच्या लोकांना प्लेगच्या धोक्याविषयी जागरूक करण्याचे कार्य त्यांनी केले. पत्रके काढून गावकारभाऱ्यांमार्फत लोकांमध्ये ती वाटली. प्लेग हा कुठल्या देवीचा प्रकोप नसून उंदरांमार्फत पसरणारा साथीचा आजार आहे हे त्यांना पटवून दिले. स्वच्छता ठेवा, घरात हवा खेळती राहील याची खबरदारी घ्या, उंदराची बिळे बुजवून टाका, काही काळासाठी मळ्यात राहायला जा; अशा अनेक सूचना त्यांनी दिल्या आणि त्याची अमंलबजावणी घडवून आणली. कोल्हापूर शहर रिकामे केले. होमियोपॅथीने प्लेगवर उपचार होऊ शकतो, अशी माहिती मिळताच देशातला पहिला सार्वजनिक होमीयोपॅथीक दवाखाना कोल्हापुरात सुरु केला. करवीर नगरीच्या प्रवेशद्वारावर येण्या-जाण्याच्या मोक्याच्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स आणि आयसोलेशन वॉर्ड्स उभारली. आजही कोल्हापूर शहरात ‘आयसोलेशन’ नावाने एक भाग ओळखला जातो. अशाप्रकारे जे शक्य होतील ते उपाय त्यांनी केले. त्याकाळी प्लेगवर कुठलेही औषध वा लस उपलब्ध नव्हती. मुंबई इलाख्यात तब्ब्ल ९ लाख लोक प्लेगच्या साथीत मरण पावली आणि गावच्या गावं उजाड झाली. महाराजांनी मात्र अथक परिश्रम करून मृत्यूची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण तरीही ३१ हजारच्या आसपास प्रजा मृत्युमुखी पडली. ही संख्या इतर प्रदेशांच्या तुलनेत नाममात्र म्हणावी इतकी कमी होती, याचे सर्व श्रेय शाहू महाराजांच्या कार्यतत्परतेला आणि दूरदर्शीपणाला जाते.
या त्यांच्या अभूतपूर्व कार्याची दखल जेव्हा सर्व वृत्तपत्रांनी घेतली. त्यावेळी प्रोफेसर फ्रेजर यांनी बंगलोरहून महाराजांना पत्र लिहून कळवले की, “पेपरमध्ये वाचून मला अतिशय आनंद झाला की कशाप्रकारे प्लेग आणि दुष्काळाविरुद्धच्या तुमच्या वैयक्तिक प्रयत्नांची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. हे प्रयत्न चालूच ठेवा, महाराज. कारण मनुष्यत्व दर्शविण्याची हीच खरी वेळ आहे.”
आज आरोग्यक्षेत्रात इतकी वैज्ञानिक प्रगती होऊन देखील केवळ राजकीय अनास्था आणि योग्य नियोजनाअभावी करोनाच्या साथीने आख्ख जग हैराण झालेलं आपण अनुभवत आहोत. अशा स्थितीत 19व्या शतकातील शाहू महाराजांची साथीच्या रोगाविषयीची जागरूकता आणि त्याविरुद्ध मुकाबला करण्यासाठी त्यांनी केलेले शर्थीचे प्रयत्न हे केवळ वाखाणण्याजोगेच नाही तर महाराज काळाच्या किती पुढे जाऊन विचार करणारे होते याचे दर्शक आहे.
महाराज कोल्हापूरच्यार्वत्र इंग्रज, ब्राह्मण आणि पारशी लोकांचाच भरणा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 1894 साली कोल्हापूर दरबारच्या एकूण 71 अधिकाऱ्यांपैकी तब्ब्ल 60 अधिकारी तर ब्राह्मणच होते. सर्व मोक्याच्या जागांवर तर जाणीवपूर्वक ब्राह्मणांचाच भरणा होता, ही बाब महाराजांच्या नजरेतून सुटली नाही. यामागे प्रामुख्याने बहुजन समाजातील शिक्षणाचा अभाव हे कारण असल्याचे महाराजांच्या लक्षात आले. वैदिक धर्माने वर्षानुवर्षे शिक्षणाची कवाडे बहुजनांसाठी बंद ठेवली होती, त्याचाच हा परिणाम. कोल्हापूर संस्थानातील 9 लाख लोकसंख्येपैकी ब्राह्मण आणि तत्सम वरिष्ठ वर्गाची लोकसंख्या केवळ 26 हजार होती, मात्र 79.1% ब्राह्मण शिक्षित होते. तर मराठा 8.6%, कुणबी 1.5%, मुसलमान 7.5%, जैन व लिंगायत 1.1% तर शिक्षित अस्पृश्यांचे प्रमाण तर अगदी नगण्य म्हणावे इतपतच होते.
राज्यसूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम हळूहळू महत्वाच्या जागी त्यांच्या विचारांना आणि ध्येयाला साथ देणाऱ्या व्यक्तींच्या नेमणूका करायला सुरुवात केली; त्यामुळे त्यांना राज्यकारभार करणे सुकर झाले. जुलै 1902 साली कायदा करून संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद केली. मार्च 1918 रोजी एक वटहुकूम काढून कुलकर्णी वतन रद्द केले आणि गावपातळीवर तलाठी हे नवीन पद निर्माण केले. तलाठ्याच्या पदावर पहिली पसंती ही अस्पृश्याला असावी अशी खास तरतूद केली गेली. ग्रामीण जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे आर्थिक आणि राजकीय शोषण करणारे कुलकर्णी वतन रद्द करून एकप्रकारे त्यांनी वर्णव्यवस्थेलाच सुरुंग लावून समाजहिताचे कार्य केले. अस्पृश्य अल्पशिक्षित जरी असला मात्र त्याचे कौशल्य आणि हुशारी पाहून महाराजांनी त्याला वकिलीच्या सनदा देण्यास सुरुवात केली. ब्राह्मणांच्या टीकेला वा जळफळाटाळा कुठल्याही प्रकारे भीक न घालता त्यांच्या मक्तेदारीला सुरुंग लावण्याचे कार्य उलट वेगाने सुरु केले.
शाहू महाराजांनी अस्पृश्य लोकांच्या उद्धारासाठी जसे कार्य केले तसेच भटक्या जातींच्याही उद्धारासाठी प्रयत्न केले. फासेपारधी, कंजारभाट, बेरड(रामोशी), बंजारा, कैकाडी, भामटा अशा अनेक जमातींची सरकार दफ्तरी गुन्हेगार जमाती म्हणून नोंद होती. ह्या जमातींना गावगाड्यात ना कुठले स्थान होते, ना उदरनिर्वाहाचे कुठले साधन होते. त्यामुळे गुन्हेगारीमागची त्यांची अगतिकता महाराजांनी बरोबर जाणली होती. सर्वप्रथम त्यांना राहण्यासाठी जागा देऊन स्थिर केले. घरे बांधण्यास आर्थिक साहाय्य केले. जमीनी, इनामे देऊन त्यांना काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. चपळ, चाणाक्ष अशा फासेपारधींची पहारेकरी म्हणून नेमणूका केल्या. ब्राह्मणेतर लोकांची आणि विशेषकरून अस्पृश्य-भटक्या विमुक्तांची अज्ञान आणि गरिबी ह्या दुष्ट चक्रातून सुटका कशी करता येईल यासाठी शाहू महाराजांनी हरेकप्रकारे शर्थीचे प्रयत्न केल्याचे दिसते. त्यांना शिक्षणाची आणि रोजगाराची सामान संधी मिळवून देण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. समाजातील लोकांच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी स्वतःपासूनच सुरुवात केली. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना आपल्या खाजगी चाकरीत नेमून घेतले; घोडेस्वार, टपालवाला, पहारेकरी, मोटार ड्रायव्हर, क्लिनर, माहूत, पोलीस अशा जागांवर त्यांची वर्णी लावली. सरकारी कचेऱ्या, शाळा, दवाखाने, सार्वजनिक पाणवठे याठिकाणी अस्पृश्यांना मुक्त प्रवेश दिला. महाराजांचे प्रयत्न हे अस्पृश्यता निवारण करून समानता निर्माण करण्याचे जरी असले त्यांचा हा मार्ग एवढा सोपा नव्हता. वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून मिळालेले विशेषाधिकार आणि ज्ञानाची मक्तेदारी हा वरिष्ठ वर्ग काही सहजासहजी सोडण्यास तयार नव्हता. ब्राह्मणी वृत्तपत्रातून महाराजांवर जहरी टीका कर नाहीतर नव्यानेच समानतेची आणि ज्ञानाची फळे चाखू पाहणाऱ्या अस्पृश्यांना येनकेनप्रकारे त्रास दे, असले त्यांचे फाजील उद्योग चाललेले असायचे.
एकदा महाराजांच्या चाकरीत असलेले मोतद्दार जे बहुतांश मांग-महार समाजतीलच होते, त्यापैकी गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीने आणि इतर मोतद्दारांनी जेवणानंतर वाड्यातील हौदावर पाणी पिले. ही गोष्ट काही वरिष्ठ जातीच्या लोकांना सहन झाली नाही. त्यामुळे त्यांनी त्या मोतद्दारांच्या म्होरक्या असलेल्या गंगाराम कांबळेला लाथाबुक्क्यांनी तुडवले आणि हे कमी की काय म्हणून त्यांनी काही दिवसांनी गंगारामवर चोरीचा आळ घेऊन ‘हौदाला हात लावतोस काय?’ असे म्हणू म्हणू आणखी बदडले. ही गोष्ट जेव्हा गंगारामने महाराजांच्या कानावर घातली तेव्हा त्यांना अपार दुःख झाले. त्यांनी गंगारामला मोतद्दारच्या कामातून मुक्त करून शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात भाऊसिंगजी रोडवर ‘सत्यसुधारक हॉटेल’ नावाचे चहाचे हॉटेल सुरु करून दिले. त्यानंतर महाराज रोज सकाळचा चहा घेण्यासाठी गंगारामच्या हॉटेलवर जाऊ लागले. हॉटेलबाहेर खडखडा उभा करून मोठ्याने फक्कड चहाची ऑर्डर देत आणि गंगारामने आणलेला किटलीतला चहा कपात ओतून गाडीतल्या सर्वांना पिऊ घालत. महाराजांना नाही म्हणायची कुणाचीही हिंमत नव्हती, त्यामुळे सर्वजण गप गुमानं तो चहा प्यायचे. अशा प्रकारे अस्पृश्यता निवारण करण्यासाठी नानाविध उपाय त्यांनी शोधून काढले होते आणि ते अमलात आणले.
राज्याच्या उद्धारासाठी प्रजेतील जातीभेद नष्ट करून एकी निर्माण करणं आणि त्यासाठी तत्पूर्वी प्रजेला शिक्षित करणं ही ध्येयधोरणं ठेवून ते कार्यरत होते. आजवर इतिहासात कुठल्याही समाजाने शिक्षणाशिवाय प्रगती केलेली नाही याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. ब्राह्मण समाजाकडे असलेली शिक्षणाची मक्तेदारी मोडीत काढून बहुजन आणि स्त्रियांना शिक्षणाचे महत्व पटवून देत त्यांना शिक्षण घेण्यास हरप्रकारे उद्युक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यासाठी सप्टेंबर 1916 मध्ये सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. त्यानुसार कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक (सक्तीचे) आणि मोफत करण्यासाठी एक समिती नेमली. या समितीच्या शिफारसीनुसार कोल्हापूर शहर व तालुक्यात गावोगावी सक्तीच्या शिक्षणाचा अंमल इ.स. 1917 पासून सुरु झाला. या कायद्यानुसार 7-14 या वयोगटातील मुलांसाठी सक्तीचे शिक्षण करण्यात आले. पालकांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवणे बंधनकारक होते. शाळेत न पाठवणाऱ्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला 2 पैसे दंड आकारण्यात येईल असा आदेश दिला. डी. आर. भोसले यांची शिक्षणाधिकारी नियुक्ती केली. 1918-19 मध्ये या सक्तीच्या शिक्षण योजनेस विस्तृत स्वरूप प्राप्त झाले. 1918 मध्ये जिथे 27 शाळांमधून 1896 विद्यार्थी शिक्षण घेत होते, तर 1922 मध्ये तिथे 420 शाळांमधून 22000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक सवलती आणि शिष्यवृत्त्या जाहीर केलेल्या होत्या.
महाराजांच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षणाचे महत्व आणि प्राधान्य किती होते, हे त्यांच्या पुढील विधानावरून चांगल्याप्रकारे लक्षात येते. ते म्हणतात, “माझी प्रजा मराठी इयत्ता तिसरी शिकून तयार झाली असती तर त्यांना राज्यकारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असती; परंतु अधिकार दान करण्यापूर्वी सर्व लोकांत शिक्षण प्रसार करणे जरूर आहे.”
राजर्षी शाहूंनी जसे प्राथमिक शिक्षणाला महत्व दिले तसेच उच्च आणि व्यावसायिक शिक्षणालाही दिले. खेडेगावचा कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी ‘पाटील व तलाठी शाळा’ सुरु केल्या. तांत्रिक शिक्षणासाठी ‘जयसिंगराव घाटगे तांत्रिक संस्था’, लष्करी शिक्षणासाठी ‘इन्फन्ट्री स्कूल’ तसेच शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रे सुरु केले.
स्त्रीला कुटुंबात आणि समाजात मानाचे स्थान असावे आणि त्यासाठी तिचे शिक्षित असणे खूप आवश्यक आहे, असे महाराजांना मनापासून वाटत होते. त्यासाठी स्त्रीशिक्षणाकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. मिस लिटल मायदेशी परतल्यावर त्यांच्या रिक्त जागी फिमेल ट्रेनिंग स्कूलमधील शिक्षिका रखमाबाई केळवकर यांची त्यांनी शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यांनी स्त्रीशिक्षणाला गतिमान केले. कोल्हापूर संस्थानात मुलामुलींच्या शाळा होत्या, त्याचप्रमाणे स्वतंत्र मुलींच्या देखील शाळा होत्या. मागास आणि दुर्गम भागातील खेडो-पाड्यातदेखील या शाळांची स्थापना केली गेली. हुशार मुलींसाठी शिष्यवृत्त्या तसेच जास्तीत जास्त मुलींच्या पास होण्याच्या संख्येनुसार शिक्षकांना बक्षीस दिले जाई. राज परिवाराचा विरोध धुडकावून महाराजांनी त्यांच्या विधवा सून इंदुमतीदेवी ह्यांना शिक्षण दिले होते. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या नैसर्गिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी खूप महत्वाचे कायदे पास करून त्यांची पिळवणूक थांबण्याचा प्रयत्न केला. जुलै 1917 मध्ये विधवांच्या पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता देणारा ‘विधवा पुनर्विवाह कायदा’ पास केला. तर जुलै 1919 मध्ये ‘कोल्हापूर इलाख्यातील विवाहसंबंधी कायदा’ पास केला. या कायद्यानुसार पुढील गोष्टी कायद्याने मान्य केल्या गेल्या,
1. जातिनिर्बंध न पाळता कोणत्याही धर्माच्या मनुष्याशी स्त्रीला विवाह करण्यास मुभा दिली.
2. विवाहसमयी पुरुषाचे वय 18 व स्त्रीचे वय 14 वर्षे पूर्ण असली पाहिजे. यामुळे बालविवाहावर बंधने आली.
3. 18 वर्षे पूर्ण झालेल्या स्त्रीला विवाहासाठी पिता अथवा पालकाच्या संमतीची आवश्यकता राहणार नाही.
याबरोबरच ऑगस्ट 1919 मधील ‘क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा’ संमत करून पती व सासरच्या छळापासून तिचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापुरातील घटस्फोटाचे नियम हे स्त्रियांना संरक्षण देणारे होते. त्याचबरोबर ‘देवदासी प्रथा प्रतिबंध कायदा’ करून या स्त्रियांना बापाच्या इस्टेटीत वारसाहक्क मान्य केला. जेणेकरून देवदासी प्रथेचा पाया उखडून टाकण्यास मदत झाली.
अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी शाळांची उभारणी केली. 24 नोव्हेंबर 1911 रोजी एक आदेश काढून राज्यातील सर्व अस्पृश्यांसाठी मोफत शिक्षण देण्याची तरतूद केली. त्यांना शिक्षणात उत्तेजन आणि प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्त्या जाहीर केल्या. तसेच शालेय साहित्य व आर्थिक स्वरूपात मदत केली. गरिबीमुळे अनेक विद्यार्थ्यांना आवड असूनही शिक्षण घेणे शक्य होत नसे. त्यांच्यासाठी मोफत राहण्या-खाण्याची सोय व्हावी म्हणून 1907 मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरु केले. युरोपियन विदुषी मिस क्लार्क हिचे कोल्हापुरातील अस्पृशोद्धाराचे कार्य सर्वांच्या नेहमी स्मरणात राहावे यासाठी महाराजांनी या वस्तीगृहास ‘मिस क्लार्क वसतिगृह’ असे नाव दिले. तसेच मराठा विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या ‘व्हिक्टोरिया वसतिगृहा’त देखील कालांतराने अस्पृश्य आणि मुसलमान विद्यार्थ्यांची सोय केली. वसतिगृहांची सोय झाल्यामुळे अस्पृश्यांना शिक्षण घेणे सुकर झाले.
सुरुवातीच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना एकत्र वसतिगृहाची सोय केली होती. मात्र कालांतराने असे लक्षात आले की, जातीभेदामुळे कनिष्ठ जातवर्गीयांना शिक्षण घेणे अवघड जात आहे आणि अशा शाळा-वसतिगृहाचा केवळ ब्राह्मण विद्यार्थीच जास्त संख्येने उपयोग करून घेत आहेत. त्यामुळे महाराजांनी वेगवेगळ्या जातसमूहांसाठी वेगवेगळी वसतिगृहे उभारली. यामागे केवळ एकच उद्देश होता की, सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी. हळूहळू शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या मनातील जातीभेद दूर होऊन पुढे जाऊन अशा वेगवेगळ्या वसतिगृहांची गरजच उरणार नाही, असा विश्वास महाराजांना वाटत होता.
कुठल्याही कार्यात महाराजांना लोकसहभाग खूप महत्वाचा वाटत असे, त्यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करत. त्यांनी जातीजातीत कार्यकर्ते निर्माण केले; त्यांना अर्थसहाय्य देऊन तसेच मार्गदर्शन करून त्यांच्याकडून वसतिगृहे निर्माण करवली. त्यासाठी मोफत जमिनी दिल्या, अनेक सवलती दिल्या, सोयी पुरवल्या, तसेच इमारत बांधणीसाठी पैसा पुरवला. केवळ कोल्हापुरातच नाही तर पुणे, अहमदनगर, नाशिक व नागपूर येथील अनेक वसतिगृहांना देखील त्यांनी आर्थिक मदत पुरवली.
शेती, उद्योगधंदे, व्यापार यांसारख्या आर्थिक क्षेत्रातील कर्तृत्व तर विशेष वाखाणण्याजोगे आहे. राज्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे शेती सुधारणेकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. दारिद्र्य आणि अज्ञानाने पिचलेला शेतकरी सतत सावकारी पाशात अडकलेला असे. त्याच्या शिक्षणाच्या सोयीबरोबरच शेतीचे उत्पन्न वाढून तो कर्जमुक्त व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतीला चांगला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने संस्थानात मोठ्या प्रमाणात बंधारे, तलाव, धरणे बांधली. रंकाळे, पद्माळे, सिद्दाळे, पेटाळे, वारुणतीर्थ, फिरंगाई, खंबाळे, रावणेश्वर, कोटीतीर्थ, सुसरबाव, महारतळे, कपिलतीर्थ, साकोली आणि कुंभारतळे या चौदा प्रमुख तळ्यांनी कोल्हापूर शहर व्यापलेले होते. महाराजांनी नवनवीन पिकांचे ज्ञान आत्मसाद केले. चहा, कॉफीची लागवड करून रेशीम पैदास करण्यासाठी तुतीची झाडे लावली. जनावरे व पिकांचे प्रदर्शन भरवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी कुलकर्णी वतने नष्ट केली. पहिल्या महायुध्दाच्या काळात परदेशातून होणारी लोखंडाची आयात बंद झाल्यानंतर लोखंडी नांगर बनविणाऱ्या किर्लोस्कर कारखान्याला लोखंडाचा पुरवठा चालू राहावा यासाठी शाहूराजांनी गडांवरील जुन्या तोफा वितळवून लोखंडी नांगर बनविण्याची परवानगी दिली होती. यावरूनच स्पष्ट होते की, शाहू महाराज खऱ्या अर्थाने लोकराजे होते; त्यांना राजवैभवापेक्षा प्रजेचे हित अधिक महत्वाचे वाटत होते.
उद्योगधंद्याच्या निर्मितीबरोबरच त्या क्षेत्रातील सहकारी चळवळीला देखील त्यांनी प्रोत्साहन दिले. इ.स. 1906 मध्ये त्यांनी ‘शाहू छत्रपती स्पिनिंग आणि विव्हिंग मिल’ स्थापन केली. 1907 मध्ये सहकारी तत्वावर एक कापडगिरणी उभी केली. या गिरणीसाठी महाराजांनी मोफत जागा दिली होती. शिरोळ रस्त्यावरील ‘जिनींग हातमाग फॅक्टरी’स आर्थिक सहाय्य केले. उद्योगधंद्याप्रमाणेच व्यापाराच्या विकासाकडेही त्यांनी लक्ष दिले. कोल्हापुरात गुळाचा मोठा व्यापार होता. मुंबई आणि गुजरात व्यापारपेठेत ह्या गुळाला अतिशय मागणी होती. त्यासाठी 1895 मध्ये ‘शाहूपुरी’ ह्या व्यापारीपेठेची स्थापना केली.
राजर्षी शाहू महाराज उत्तम प्रशासक असल्याबरोबरच कलाकृतींचे देखील उत्तम रसिक होते. त्यातून ते विविध कलांचे आणि कलाकारांचे हक्काचे आश्रयदाते बनले. शिकार, मल्लविद्या, संगीत, नाट्य, चित्रपट, चित्रकला इ. कलांना त्यांनी आश्रय दिला होता. हरहुन्नरी कलाकारांना आपल्या चाणाक्ष नजरेने हेरून त्यांना राजाश्रय दिल्यामुळे विविध कलांची प्रगती घडून आली होती. बालगंधर्व म्हणजे गरीब घरातून आलेला नारायण राजहंस हा लहान असल्यापासूनच त्याचे गाण्याचे कौशल्य पारखून त्यांनी लागेल ती मदत करून त्याची कला अजरामर केली.
चित्रकार आबालाल रहिमान याची गोष्ट तर अगदी रंजक आहे. मुंबईहून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण करून आलेला हा अवलिया त्याच्या कलेत अगदी तरबेज होता. मात्र तिकडे एका स्पर्धेत वशिल्याने एक मुलगा पहिला आला व त्यामुळे आबालाल यांना दुसरा क्रमांक मिळाला. ह्या प्रकाराने ते चिडले व त्यांनी आयोजकांशी वाद देखील घातला. मात्र काही उपयोग न झाल्याने निराश होऊन ते कोल्हापुरात परत आले. शाहू महाराजांना आबालालच्या चित्रकलेवर पूर्ण विश्वास होता आणि निराशेच्या गर्तेत जाऊन त्याच्यातील कलाकार हरवू नये असं त्यांना मनापासून वाटत होतं. त्यामुळे त्यांनी आबालालला दरबारात बोलवून त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याला सरकारी शाळेत चित्रकार म्हणून काम दिले. पण आबालालचा स्वभाव थोडा चंचल होता. मनाला वाटले तर शाळेत गेले, नाहीतर गेले कुठेही फिरायला. इतर लोक त्याला नोकरीवरून काढण्यासाठी महाराजांना सुचवू लागले. तेव्हा महाराजांनी विचार केला की आबालालच्या चित्रकलेसाठी आपल्यालाच काहीतरी करायला हवे. त्यानंतर बऱ्याचदा महाराज त्याला स्वतःच्या सोबत घेऊन जात आणि थेट एखादा जीवंत देखावा दाखवून लागलीच त्याच्याकडून तिथल्या तिथे ती चित्रे काढून घेत. अशाप्रकारे त्यांनी आबालालकडून बरीच चित्रे काढून घेतली. आज आबालालची पंचगंगेच्या काठावरची देवळाची, निसर्गचित्रे जी आहेत; ती राजांनी अशीच त्याच्याकडून काढून घेतली आहेत. अचूक, हरहुन्नरी कलाकाराची चाणाक्ष निवड आणि योग्य ती मदत करून त्याची कला बहरास आणणे यात महाराजांचा हातखंडा होता. याबरोबरच संगीतसूर्य केशवराव भोसले, नरहरबुवा यांची कोल्हापूरकर नाटक मंडळी, दत्तोपंत हल्याळकर यांची नाटक मंडळी, गायक अल्लादियाखॉंसाहेब, गायिका केसरबाई केरकर ज्यांना रवींद्रनाथ टागोरांच्याहस्ते विश्वभारतीतर्फे ‘सुरश्री’ ही अतिशय सन्मानाची पदवी मिळाली होती, तसेच कवी सुमंत अशा अनेकानेक हिऱ्यांना शोधून त्यांना पैलू पाडण्याचे काम शाहू महाराजांनी केले; त्यामुळेच करवीरनगरी ‘कलानगरी’ म्हणून देखील उदयास आली.
मल्ल विद्येच्या प्रेमाखातर संस्थानात खासबाग कुस्ती मैदान, मोतीबाग तालीम उभारून मल्ल विद्येला उदार राजाश्रय दिला. तर पॅलेस थिएटर, महाराष्ट्र सिनेमा, देवल क्लब यांच्या निर्मितीने कलाकृतीच्या सादरीकरणासाठी मुक्त अवकाश मिळाला.
राजर्षी शाहू महाराज अशा एका भारतीय संस्थानाचे संस्थानिक होते, जी संस्थाने ब्रिटिशांची मांडलिक होती. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते जरी असले तरी तशा भूमिका उघडपणे घेणं त्यांना शक्य नव्हतं. ब्रिटिश सत्तेपायी असणारी निष्ठा त्यांना वेळोवेळी व्यक्त करणं भाग होतं. ब्रिटिश सत्तेचा विरोध करणं, म्हणजे संस्थान खालसा होण्याची भीती आहे; याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्याप्रमाणे मग व्यवहारचातुर्य दाखवून ब्रिटिशांप्रती निष्ठा व्यक्त करून होता होईल तेवढे प्रजाहित साधावे असे त्यांचे धोरण होते. पण भारतीय स्वातंत्र्यलढ्यास त्यांनी होईल तशी छुपी मदत केली हेही तितकेच खरे आहे. कोल्हापुरातील ‘शिवाजी क्लब’ या क्रांतिकारी संघटनेला ते दरवर्षी 500₹ आर्थिक मदत करत. तर या क्रांतिकारकांनी सुरु केलेल्या ‘वनिता वस्त्र भांडारा’तून ते दरवर्षी संस्थानची सरकारी कापड खरेदी करत.
स्वराज्याविषयी आपले मत व्यक्त करताना त्यांनी एकदा म्हटले होते की, “आम्हांला स्वराज्य पाहिजे, पण स्वराज्यास आम्ही पात्र नाहीत. त्यासाठी आपण प्रथम जातीभेद झुगारून दिले पाहिजेत.”
महाराजांच्या ह्या वरील उद्गारातून सामाजिक सुधारणेविषयीचा असणारा त्यांचा अग्रक्रम चांगल्याप्रकारे अधोरेखित होत आहे.
आंबेडकरांच्या कार्यावर आणि नेतृत्वावर महाराजांचा गाढा विश्वास होता. तसेच ह्या दोघांचे वैयक्तिक जिव्हाळ्याचे देखील संबंध होते. महाराज जेव्हा जेव्हा मुंबईला जात तेव्हा जाणीवपूर्वक आंबेडकर जेथे असतील, तेथे जाऊन त्यांची भेट घेत. डॉ. आंबेडकरांचे परदेशात शिक्षण चालू असताना जेव्हा कधी त्यांना आर्थिक गरज वाटे, तेव्हा ते महाराजांना हक्काने मागू शकत होते. त्यांनी सुरु केलेल्या दलित आंदोलनास देखील महाराजांनी तेवढ्याच विश्वासाने मदत केली. 1920 साली माणगाव येथे भरलेल्या दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. तर डॉ. आंबेडकर हे परिषदेचे अध्यक्ष होते. आंबेडकरांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीच्या सुरुवातीस अशाप्रकारे शाहू महाराजांनी दिलेला पाठींबा हा त्यांचा उत्साह द्विगुणित करणारा ठरला. 1920 मध्येच नागपूर येथे झालेल्या ‘अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषेदे’ला देखील तेवढ्याच उत्साहाने महाराज उपस्थित राहिले होते. त्यातूनच त्यांची दलितोद्धाराची मनापासून असलेली कळकळ अनुभवास येते.
डॉ. आंबेडकरांनी 4 सप्टें. 1921 रोजी लंडनहून महाराजांना एक पत्र लिहिले होते; त्या पत्राच्या शेवटी ते महाराजांना लिहितात की, “आपली प्रकृती उत्तम असेलच, अशी आशा आहे. आपली आम्हांला खूप आवश्यकता आहे. कारण भारतात प्रगती करीत असलेल्या सामाजिक लोकशाहीच्या चळवळीचे आपण एक महान आधारस्तंभ आहात.” या उद्गारातून आंबेडकरांना महाराजांविषयी किती प्रेम आणि आदर होता हे दिसून येते.
महात्मा फुलेंचा वैचारिक आणि समाजसुधारणेचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे कार्य केले शाहूरायांनीच. पुढे जाऊन आंबेडकरांनी सुरु केलेल्या सामाजिक सुधारणा चळवळीतही ते खूप लक्षवेधी भूमिका निभावू शकले असते. परंतु डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक कार्याची सुरुवात साधारण 1920 मध्ये केली आणि आपल्या समाजाचे दुर्दैव असे की पुढील दोन वर्षातच म्हणजे 6 मे 1922 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे शाहू महाराजांचे निधन झाले. 1994 साली कोल्हापूरच्या गादीवर आलेल्या शाहूराजांना समाजकार्य करण्यास आणि समाजसुधारणेचे त्यांचे इप्सित साध्य करण्यास अवघी 28 वर्षे मिळाली. ह्या कालावधीतला त्यांच्या कामाचा आवाका मन थक्क करणारा आणि पुढील अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायक राहील असाच आहे.