22 मार्च – जागतिक जल दिन (World Water Day)

जगभरात 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ (World Water Day) म्हणून साजरा केला जातो. ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्यामागील उद्देश हा जगातील सर्व देशांतील सर्व लोकांपर्यंत स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पोहोचवणे तसेच पाण्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे हा आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. जगभरात दुष्काळाची तीव्रता वारंवार अनुभवला येत असताना सर्वसामान्यांमध्ये स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याविषयीची जागरूकता निर्माण होणे अतिशय गरजेचे आहे.

काय आहे यावर्षीची ‘जागतिक जल दिना’ची नवी थीम –

संयुक्त राष्ट्र संघामार्फत दरवर्षी या दिनाचे औचित्य साधून नवनवीन थीम ठरवून जल संवर्धनाचे लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षीची (2023) जागतिक जल दिनाची थीम आहे, ‘पाणी आणि स्वच्छतेची समस्या सोडवण्यासाठी परिवर्तनाचा वेग वाढवणे (accelerating change to solve the water and sanitation crisis).’

या थीमअंतर्गत प्रत्येक व्यक्तीने जल संवर्धनासाठी कृतिशील व्हावं, असं आव्हान या दिनानिमित्त करण्यात आलेलं आहे. पाण्याचा योग्य वापर आणि व्यवस्थापन करून प्रत्येक व्यक्ती, त्याचे कुटुंब, शाळा आणि एकंदर समाजाने ह्या परिवर्तनात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.

काय आहे ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्यामागचा इतिहास –

1992 साली ब्राझीलमध्ये झालेल्या ‘पर्यावरण आणि विकास’ संबंधी संयुक्त राष्ट्र संघाच्या संमेलनात जागतिक जल दिन साजरा करण्याविषयीची कल्पना सर्वप्रथम मांडण्यात आली. त्यानुसार 22 मार्च 1993 या दिवशी सर्वप्रथम ‘जागतिक जल दिन’ साजरा केला गेला.

जल व्यवस्थापनाचे महत्व –

पृथ्वीचा सुमारे 71% भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. माञ त्यापैकी 97% समुद्राचे खारे पाणी आहे आणि केवळ 3% पाणी पिण्यायोग्य आहे. या पिण्यायोग्य पाण्याचेही असमान वितरण होत असल्याचे आपण पाहतो. एकीकडे मोठ्या शहरांमधील सोसायट्या, मॉल्स, उद्योगधंदे, कारखाने यांना बारमाही मनसोक्त पाणी उपलब्ध करून दिले जाते, तर खेडोपाडी, शहरातील झोपडपट्ट्या, वस्त्या येथील लोकांपुढे मात्र स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. समाजातील सर्व स्तरात पाण्याविषयीची जागरुकता निर्माण होणे अतिशय गरजेचे आहे, यात शंकाच नाही, परंतु सर्वांना समान पातळीवर पाण्याचे वितरण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

(World Water Day 2023)

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *