Agro Tourism – कृषी पर्यटन

agro tourismपर्यटन क्षेत्रातील व्यवसायाची नवी संधी म्हणून ‘कृषी पर्यटन’ ही  संकल्पना भारतात झपाट्याने विकसित होत आहे. भारतात कृषी पर्यटनाची सुरुवात ही सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात झाली. आज देशभरात अनेक कृषी पर्यटन केंद्रे विकसीत होत आहेत. शहरी लोकांना ग्रामीण संस्कृतीच्या जवळ घेऊन येणाऱ्या या कृषी पर्यटन केंद्राना पर्यटकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. 

कृषी पर्यटन म्हणजे काय? –

कृषी पर्यटन म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, शेती आणि शेतीशी निगडित कामे, ग्रामीण जीवन आणि संस्कृती अशा गोष्टी पर्यटकांना पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देणे होय. वाढते शहरीकरण आणि दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडासा विसावा म्हणून आजकाल फिरायला जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातही ताज्या हवेत निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा पर्यटकांचा ओढा अधिक असतो. अशा पर्यटकांसाठी कृषी पर्यटन हा एक उत्तम पर्याय ठरतो आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांसाठी शेती हा आजकाल इतका फायदेशीर व्यवसाय राहिलेला नाही. अशा परिस्थितीत शेतीशी निगडित त्याला पूरक असे नवनवीन व्यवसाय करणे निकडीचे झाले आहे. त्यातूनच आकाराला आलेली कृषी पर्यटन ही संकल्पना आहे. शेती, शेतकऱ्यांचं दैनंदिन जीवन ह्या गोष्टी पर्यटकांना जवळून दाखवणे, त्यातून शेतकऱ्यांना पैशाची मिळकत होणे, हे ह्या कृषी पर्यटन व्यवसायाचे मूळ उद्दिष्ट आहे. 

कृषी पर्यटन केंद्राची स्थापना – 

कृषी पर्यटन हे प्रामुख्याने भारतातील शहरातून आलेले तसेच परदेशातून आलेले पर्यटक यांना नजरेसमोर ठेवून आकाराला आले आहे. कृषी पर्यटन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपली शेती कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करणे अपेक्षित असते. येणाऱ्या पर्यटकांसाठी निवासाची सोय करणे, दळणवळणाच्या सुविधा, तसेच इतर पायाभूत सुविधांची उभारणी करणे आवश्यक असते. या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रचंड भांडवल गुंतवणूक करावी लागते. महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य तसेच महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट) यांसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांत स्थापन झालेल्या संस्थांकडून कृषी पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. कृषी पर्यटनाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता येत्या काळात बहुसंख्य शेतकरी या शेतीपूरक व्यवसायाचा लाभ घेऊ शकतील अशी अपेक्षा आहे.

agro tourismकृषी पर्यटनाला मिळणारा प्रतिसाद – 

खरंतर मानवी जीवनाची मुळे ही निसर्गाशी जोडलेली असतात. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात मानव कधी नव्हे इतक्या वेगाने शहरातील आधुनिक जीवन पद्धती स्वीकारत आहे. तरी निसर्गाच्या सानिध्यातच त्याला खरे सुख समाधान मिळते, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळेच वाढत्या शहरीकरणाबरोबर नैसर्गिक पर्यटनस्थळांना भेट देण्याचे प्रमाणही वाढत आहे. आजकाल शहरे वेगाने फोफावत आहेत. ग्रामीण तरुण जनता देखील गावं सोडून शहरात स्थायिक होताना दिसत आहेत. शहरी नागरिक, लहान मुले आजकाल ग्रामीण जीवनापासून दुरावली आहेत. आपले अन्न, दूध ज्या ठिकणाहून येते, अशी ठिकाणे पाहण्याची, अनुभवण्याची संधी कृषी पर्यटन ऊपलब्ध करून देत आहे. ज्या मुलांनी आजवर शेती, शेतीशी निगडित कामं कधीच पाहिली नाही ती त्यांना जवळून दाखवण्याची संधी कृषी पर्यटनामुळे पालकांना मिळाली आहे. त्यामुळे कृषी पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

कृषी पर्यटनाचे स्वरुप – 

शहरातली कोंदट हवामान, धावपळ, ताण-तणाव यातून घटकाभर विसावा म्हणून शहरी नागरिक कृषी पर्यटनाला पसंती देत आहेत. शहरी पर्यटकांना शेती संबंधित सर्व गोष्टी; जसे पिकांची पेरणी, पिकांचे प्रकार, शेतीतील कामे याची ओळख करून देणे. त्याबरोबरच बैलगाडीची सफर, विहिरीतून पाणी काढणे, गुरांच्या धारा काढणे, झाडाची फळं काढणे, हुरडा पार्टी, खापरावर बनवली जाणारे मांडे ह्या सर्व गोष्टींची ओळख करून देणे. शहरातून आलेल्या ह्या पर्यटकांना गाव आणि गावच्या आजूबाजूचा परिसर यांची माहिती देणे. गावातील महत्वाची ठिकाणे, मंदिरे यांची माहिती करून देणे, अशा स्वरूपातील अनेक गोष्टी कृषी पर्यटनात समाविष्ट होतात. 

कृषी पर्यटनाचे फायदे – 

  • शहरी आणि ग्रामीण संस्कृतीची परस्पर देवाणघेवाण या माध्यमातून होणे शक्य होते.
  • कृषी पर्यटन शेती पूरक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी कामात त्यामुळे अडथळा येत नाही.
  • कृषी पर्यटन केंद्र म्हणजे शेतकऱ्याची शेतजमीनच असल्यामुळे व्यवसायासाठी वेगळी जागा खरेदीची भानगड राहत नाही.
  • इतर पर्यटनस्थळांना भेट देण्यापेक्षा कृषी पर्यटन स्थळांना भेट देणे किफायतशीर असल्यामुळे अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे देखील या निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटू शकतात.
  • कृषी पर्यटन म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून शेती, ग्रामीण जीवन आणि संस्कृती यांचे शिक्षणच दिले जाते. त्यामुळे लहानणापासूनच शहरातच वाढलेल्या मुलांसाठी शिक्षण आणि मनोरंजनाचा हा एक उत्तम पर्याय उपलब्ध होतो.
  • कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांच्या ताज्या शेतमालाला पर्यटकांच्या रूपाने आपसूक ग्राहक निर्माण होतो आणि शहरी लोकांना ताजा भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणे शक्य होते. 
  • गावातील महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांसाठी शहरी पर्यटकांच्या रूपाने ग्राहक मिळतो. 

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी नक्कीच ह्या पर्यटन व्यवसायाचा विचार करू शकतात. कमीत कमी खर्चात शहरी पर्यटकांना अस्सल गावरान संस्कृती अनुभवण्यासाठी कृषी पर्यटन ही एक उत्तम संधी आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या व्यवसायाकडे वळण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना अधिकाधिक सहकार्य आणि मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *