भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे (Bharatratna Mahrishi Dhondo Keshav Karve)
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा कर्वे यांचा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात 18 एप्रिल 1858 रोजी जन्म झाला. हा काळ भारतीय समाजातील पुनर्जागरणाचा (Indian Renaissance) काळ होता. ब्रिटिशांच्या सत्ताकाळात इंग्रजीतून शिक्षण घेतलेल्या भारतातील तरुण-तरुणींना पाश्चात्य आधुनिक विचारांची नव्याने ओळख होत होती. त्यातून भारतातील विषमता, अंधश्रद्धा, अज्ञान याविरोधात लढण्यासाठीची प्रेरणा इथल्या तरुण पिढीला मिळत होती. अवती-भोवती असे आधुनिकतेचे वारे वाहत असलेल्या ह्या काळातच धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला.
बालपण आणि शिक्षण
रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात शेरवली गावी जन्मलेले अण्णा कर्वे यांनी मुरुड येथे मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील उच्च शिक्षणासाठी मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्रवेश घेतला. तिथे त्यांनी गणित विषयात पदवी घेतली. पुढे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात इ.स. 1891-1914 या 23 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी गणिताचे अध्यापन केले.
विवाह
त्याकाळी समाजमान्य असणाऱ्या बालविवाहाच्या (कु)प्रथेप्रमाणेच धोंडो केशव कर्वे यांचा देखील वयाच्या चौदाव्या वर्षी राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्यावेळी केवळ आठ वर्षांच्या होत्या. इ.स. 1891 साली, वयाच्या 27व्या वर्षी राधाबाईंचा बाळंतपणात मृत्यू झाला.
पुनर्विवाह
राधाबाईंच्या मृत्यूनंतर अण्णांनी गोदूबाईंशी पुनर्विवाह केला. पण त्याकाळात हा पुनर्विवाह एक साधी-सुधी घटना नव्हती, तर एक सामजिक बंड होते. त्याकाळात विधुर व्यक्तीने अल्पवयीन कुमारिकेशी पुनर्विवाह करण्याची प्रथा होती. मात्र ह्या कुप्रथेला अण्णांनी हरताळ फासला. त्यांनी कुठल्या कुमारिकेशी विवाह न करता पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमध्ये शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. अण्णांनी विधवेशी केलेला पुनर्विवाह ही गोष्ट त्याकाळी एक समाजविघातक घटना म्हणून पाहिली गेली. मुरुड येथील गावी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव समंत झाला. पण या सामाजिक दबावापुढे अण्णा दबले नाहीत. पत्नी गोदूबाई म्हणजेच लग्नानंतरच्या आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांच्या साथीने सामाजिक कार्यात दुप्पट वेगाने सक्रिय झाले.
विधवा पुनरुत्थानाचे कार्य
विधवा स्त्रीशी केलेल्या पुनर्विवाहामुळे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि त्यांच्या पत्नीला सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले. मात्र त्यामुळे माघार न घेता, अण्णांनी यासंदर्भात ठोस सामाजिक कार्य करण्यास आरंभ केला. त्याकाळात ब्राह्मण समाजात विधवांची स्थिती अत्यंत वाईट होती. त्यांना पुनर्विवाह करण्याची समंती नव्हती. केशवपन सारखी अघोरी प्रथा त्यांच्या माथी मारली गेली होती. अशा ह्या विधवांसाठी तसेच बालविवाह, जरठ कुमारी विवाह अशा अनेक कुप्रथांच्या बळी ठरलेल्या स्त्रियांसाठी अण्णांनी इ.स. 1993 मध्ये विधवा पुनर्विवाह मंडळची स्थापना केली. विधवांसाठीची भारतातील पहिली शाळा हिंगणे येथे सुरु केली. अण्णांची विधवा मेहुणी पार्वतीबाई आठवले ह्या या शाळेतील पहिल्या विद्यार्थिनी. इ.स. 1896 मध्ये ‘अनाथ बालिकाश्रम’ काढला. तसेच ‘विधवा विवाहोत्तेजक’ मंडळाची स्थापना केली. इ.स. 1900 मध्ये प्लेगच्या साथीमुळे अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. तिथेच अण्णांनी बायाच्या साथीने विधावांसाठी वसतिगृह सुरू केले. अण्णांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांचे सहकारी रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी पुण्याजवळील हिंगणे येथील आपली सहा एकर जमीन आणि 750 रुपयांची देणगी अण्णांच्या सामाजिक कार्यासाठी दिली. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी उभारून ‘हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थे’ची पायभरणी केली.
भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना
इ.स. 1915 मध्ये अण्णांनी ‘जपान विमेन्स युनिव्हर्सिटी’ या नावाचे पुस्तक वाचले. त्यामुळे जपान येथील महीला विद्यापीठाप्रमाणे भारतातही स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करावे असा ध्यास त्यांच्या मनाने घेतला. त्यानुसार त्यांनी इ.स.1916 मध्ये, महीला विद्यापीठाची स्थापना केली. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे असा उद्देश समोर ठेवून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. तेथे स्त्रियांना प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला, चित्रकला, गायनकला इ. विषय शिकवले जात. विद्यापीठाच्या आर्थिक विवंचनेच्या काळात विठ्ठलदास ठाकरसी या उद्योजकाने या महिला विद्यापीठास 15 लाखांची देणगी दिली होती. तसेच आपल्या आईचे नाव विद्यापीठास द्यावे अशी देखील विनंती केली. त्यामुळेच पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांच्या आईच्या स्मरणार्थ या महिला विद्यापीठाचे नाव ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी’ (SNDT) असे ठेवण्यात आले.
विदेशी प्रवास
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी इ.स. 1929-1932 याकाळात युरोप, अमेरिका, आशिया व आफ्रिकेचा दौरा केला. ते 13 महिने विदेशात होते. महिला विद्यापीठाच्या कार्याचा प्रचार करून, विद्यापीठासाठी आर्थिक मदत मिळवणे. तसेच विदेशातील हायस्कूल, कॉलेजेस यांची पाहणी करून त्यापासून आपल्या कार्यासाठी बोध घेणे हे त्यांच्या विदेश प्रवासाची उद्दिष्टे होती. युरोप, अमेरिकेतील हिंदी विद्यार्थी आणि आफ्रिकेतील हिंदी स्त्रियांपुढे त्यांनी व्याख्याने दिली.
निष्काम कर्म मठाची स्थापना
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 04 नोव्हेंबर 1904 रोजी निष्काम कर्म मठाची स्थापना केली. लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन, मन, धन अर्पण करणारा संघ निर्माण करून त्याचा विस्तार करणे हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.
महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी इ.स. 1935 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ सुरू केले. त्यामुळे खेडेगावात अनेक शाळा सुरू करण्यात आल्या. ज्या गावात बोर्डाच्या शाळा नाहीत, अशा ठिकाणी प्राथमिक शाळा चालवण्यासाठी मदत करणे हा वरील मंडळाचा उद्देश होता.
समता संघ
मानवी समता प्रस्थापित करण्यास हातभार लावण्याचे ध्येय बाळगून इ.स. 1944 मध्ये अण्णांनी ‘समता संघ’ ची स्थापना केली. समाजातील सर्व प्रकारचे भेदभाव मिटावेत, विशेषाधिकार संपवावेत, आणि सर्व स्त्री पुरुषांच्या सरसकट कल्याणाचा पुरस्कार करणे हे या संघटनेचे ध्येय होते. समाजातील असलेले आर्थिक, सामाजिक भेदभाव दूर होऊन सर्वांमध्ये समतेची भावना निर्माण व्हावी हा समता संघाचा हेतू होता.
अध्यापिका विद्यालयाची स्थापना
महीला विद्यापीठाच्या वतीने इ.स. 1917 मध्ये अध्यापिका विद्यालय सुरू करण्यात आले. या विद्यालयामुळे अनेक स्त्रियांना प्राथमिक शाळा शिक्षिका होणे शक्य झाले. आनंदीबाई कर्वे यांच्या बहीण आणि महर्षी कर्वे यांच्या मेहुणी पार्वतीबाई आठवले या कर्वेंनी विधवांसाठी सुरू केलेल्या शाळेतील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. ह्या पार्वतीबाईंनी कर्वेंनी सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थांचे काम प्रगतीपथावर आणण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. इ.स.1955 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ या अध्यापिका विद्यालयाला ‘पार्वतीबाई अध्यापिका विद्यालय’ असे नाव देण्यात आले.
महर्षी कर्वे यांना मिळालेल्या पदव्या
अण्णांनी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेल्या अथक परिश्रमामुळे जनतेने त्यांना ‘महर्षी’ पदवी प्रदान केली. मात्र त्याव्यतिरिक्त देखील विविध स्तरातून त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली. त्यांना विविध पदव्या देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पदव्या खालीलप्रमाणे :
1. पुणे विद्यापीठ – डी. लिट – 1951
2. बनारस विद्यापीठ – डी. लिट – 1952
3. एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ – डी. लिट – 1954
4. भारत सरकार – पद्मभूषण – 1955
5. मुंबई विद्यापीठ – एल. एल. डी. – 1957
6. भारत सरकार – भारतरत्न – 1958
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेले सत्कार्य आयुष्यभर अविरतपणे सुरू ठेवले. त्यासाठी त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि त्यांची पत्नी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांनी मोलाची साथ दिली. संस्थेच्या कार्यासाठी साधी 1 रुपये जरी देणगी मिळणार असेल, तर ती स्वीकारण्यासाठी ते मैलो न् मैल पायी चालत जात. नोकरीसाठी जाताना ते हींगणे(आताचे कर्वेनगर) ते फर्ग्युसन कॉलेज रोज पायी चालत जात. स्वतः अत्यंत साधी आणि काटकसरीची राहणीमान ठेवून पै न् पै वाचवून त्यांनी संस्थेच्या कार्यालाच नेहमी अग्रस्थानी मानले. त्यांना चार मुले होती. रघुनाथ कर्वे हे पहिली पत्नी राधाबाईचे पुत्र होते. ते गणिताचे प्राध्यापक आणि समाजस्वास्थ्य मासिकाचे संपादक होते. लैंगिक ज्ञान आणि कुटुंबनियोजन यांसारख्या विषयांवर चर्चा करणे इतकेच काय तर त्याविषयी ‘ब्र’ काढणे हेदेखील त्याकाळात समाजमान्य नव्हते. अशा काळात रघुनाथ कर्वे यांनी या विषयीचे ‘समाजस्वास्थ्य’ नावाचे हे मासिक सुरू केले होते. त्याला प्रस्थापित समाजातून खूप विरोध झाला, इतकेच काय तर त्यांच्यावर न्यायालयीन खटले देखील भरण्यात आले. मात्र र. धो. कर्वे या सामाजिक दबावाला बधले नाहीत. अशाप्रकारे महर्षी कर्वे यांच्या मुलांनी देखील आपल्या वडिलांसारखाच समाजकार्याचा वारसा पुढे चालवला. महर्षी कर्वे यांना 104 वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभले. हे आयुष्य ते सर्वार्थाने आणि पूर्णत्वाने जगले. 1958 मध्ये त्यांनी वयाची शंभरी गाठली असताना भारत सरकारने भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा उचित सन्मान केला. शेवटी 09 नोव्हेंबर 1962 रोजी वृद्धापकाळाने महर्षी कर्वे यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या सामाजिक कार्याचा महावृक्ष आजही डौलदारपणे उभा आहे.
जन्म – 18 एप्रिल 1858
मृत्यू – 09 नोव्हेंबर 1962
सामाजिक कार्य – स्त्री शिक्षण आणि विधवा पुनरुत्थान
पुरस्कार – पद्मभूषण (इ.स. 1955), भारतरत्न (इ.स. 1958)
वडील – केशव बापूराव कर्वे
आई – लक्ष्मीबाई केशव कर्वे
पत्नी – राधाबाई धोंडो कर्वे, आनंदीबाई धोंडो कर्वे
अपत्ये – रघुनाथ, भास्कर, दिनकर, शंकर
Bharatratna Mahrishi Dhondo Keshav Karve