कैरो 678 (Cairo 678), 2010

(मोहम्मद दियाब दिग्दर्शित 2010 मध्ये प्रदर्शित एक इजिप्तशियन सिनेमा)

ही गोष्ट आहे इजिप्तमधील तीन वेगवेगळ्या सामाजिक वर्गातील फायजा, सेबा आणि नेल्ली या तीन महिलांची. पण ही गोष्ट फक्त ह्या तिघींची नाही, ती जगभरातल्या सगळ्याच स्त्रियांची आहे. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांवर दैनंदिन होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविषयी हा सिनेमा भाष्य करतो. फायजा, सेबा, नेल्ली यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी त्यांच्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो आणि त्या तिघी त्या घटनांना कशाप्रकारे प्रतिकार करतात, या सत्यकथेवर आधारित या सिनेमाचे कथानक आहे.

कष्टकरी वर्गातील दोन मुलांची आई असलेली फायजा आधीच घरातल्या आर्थिक अडचणींमुळे त्रासलेली आहे, त्यात रोज कामावर जाताना बसमध्ये, टॅक्सीमध्ये, रस्त्यावर पुरुषांच्या लैंगिक छळाला बळी पडत असते, अशा रोजच्या अनुभवांच्या परिणामामुळे ती सतत खूप अस्वस्थ आणि घाबरलेली असते. त्याचा परिणाम तिच्या नवऱ्याशी असणाऱ्या शारीरिक संबंधां (physical relation) वरही होत आहे.

बाहेर रोज बसमधल्या गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी पुरुषांकडून होणाऱ्या घाणेरड्या स्पर्शाने आता तिला शारीरिक संबंधाचीच घृणा वाटायला लागली आहे. अशा परिस्थितीत त्यामुळे आता रोज नवऱ्याशी देखील भांडणं होत आहेत. तर सेबा आणि नेल्ली या उच्च वर्गातील स्त्रिया सार्वजनिक ठिकाणी अतिशय वाईट प्रकारे लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. सेबावर भर स्टेडियममध्ये पुरुषांच्या घोळक्याने लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर तिच्या नवऱ्याने तिच्याशी असणारे संबंध तोडले, कारण त्याला आता ती फक्त त्याची राहिलीय असं वाटत नाही.

या घटनेने पूर्णतः कोलमडून पडलेल्या सेबाने त्याविरुद्ध मीडियातून आवाज उठवला आणि ती अशाप्रकारे लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या स्त्रियांना संघटित देखील करू पाहत आहे. तर नेल्लीने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला. लैंगिक अत्याचाराविरुद्ध गुन्हा नोंदवणारी नेल्ली ही इजिप्तमधली पहिली महिला आहे. लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवताना तिला फक्त तिच्या होणाऱ्या नवऱ्याची साथ आहे, बाकी सगळे लोक अगदी पोलिसही विरोधात आहे, तिने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवू नये अशी त्यांची इच्छा आहे. कारण त्यामुळे इजिप्तची बदनामी होतेय, असं त्यांचं म्हणणं आहे.

सर्व दाबावांना झुगारून नेल्लीने गुन्हा नोंदवला आणि कोर्टात केस लढवली. ह्या प्रकारात तिला न्याय मिळून दोषीला 3 वर्षाची शिक्षा झाली. नेल्लीच्या ह्या घटनेनंतर एक वर्षाने इजिप्तमध्ये लैंगिक छळ हा कायद्याने फौजदारी गुन्हा ठरला. मात्र तरीही ह्या कायद्याखाली गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी खूप कमी महिला समोर येतात.

हा सिनेमा जरी महिलाकेंद्रित असला, तरी त्यात पुरुषांना केवळ व्हिलनच्या रूपात न दाखवता, त्यांच्या समस्या देखील नमूद करण्याचा प्रयत्न दिसतो. आर्थिक समस्येने ग्रासलेल्या पुरुषांची बाजू चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दियाब यांनी केला आहे.

हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दिगदर्शक मोहम्मद दियाब यांच्यावर असे सिनेमे बनवून इजिप्तला बदनाम करत असल्याची टीका देखील झाली. त्याला उत्तर देताना दियाब यांनी सांगितलं, ‘यात इजिप्तला बदनाम करण्याचा कुठेही संबंध येत नाही, कारण चित्रपटातून मांडलेली स्त्रियांची समस्या ही केवळ इजिप्तशियन स्त्रियांची नसून ही जगभरातील स्त्रियांची सार्वत्रिक समस्या आहे.’

चित्रपटात एके ठिकाणी फायजा, सेबा आणि नेल्ली या तिघींचा त्यांच्या वर्गीय स्थानावरून जो वाद होतो, तो खूप महत्त्वाचा आहे. वर्गीय स्थानानुसार त्यांना येणाऱ्या समस्या, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती यामध्ये फरक असला, तरी एक ‘स्त्री’ म्हणून तिघीही पुरुषांकडून लैंगिक अत्याचारग्रस्त आहेत, ही त्यांच्यातील समानता आहे. तोच धागा घेऊन दिग्दर्शक मोहम्मद दियाब आणि साराह गोहर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *