पारध्याची गाय
‘पारध्याची गाय’ (Pardhyachi Gay) हा तीन कथांचा कथासंग्रह प्रसिध्द लेखक उत्तम कांबळे (Uttam Kamble) यांनी लिहिला असून ‘मनोविकास प्रकाशन’ने तो प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहात ‘देवनहळीचा रस्ता’, पारध्याची गाय’ आणि ‘स्मारक’ अशा तीन कथा आहेत. आपल्या येथील सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या अशा ह्या कथा आहेत.
या कथासंग्रहातील पहिली कथा आहे, ‘देवनहळीचा रस्ता’. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात अडकलेल्या एका गावखेड्याची दुरावस्था ह्या कथेतून लेखकांनी मांडलेली आहे. दोन्ही राज्य सरकारांकडून होणारे दुर्लक्ष, स्थानिक पातळीवरील श्रेयाचं राजकारण, स्थानिक नेतेमंडळींच्या भांडणात गावाचा रखडलेला विकास यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील देवनहळी गाव साध्या तालुक्याला जोडणाऱ्या पक्क्या रस्त्यापासूनदेखील वर्षानुवर्षे कसे वंचित आहे, याचे वर्णन सदर कथा करते.
गावच्या प्रगतीमध्ये तिथे असणाऱ्या दळणवळणाच्या सुविधेचा सर्वात महत्वाचा वाटा असतो. माञ तरी आपण पाहतो, की महाराष्ट्रातील केवळ सीमाभागातीलच नव्हे, तर उर्वरित प्रदेशातील खेडोपाड्यातदेखील पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. राजकारण, भ्रष्टाचार, शासकीय पातळीवरील अनास्था या दुष्चक्रात गावखेड्यांच्या विकासाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे तेथील जनतेला अगदी प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावे लागते.
ह्या कथासंग्रहातील दुसरी कथा आहे ‘पारध्याची गाय’. ही कथा मराठवाड्यातील उस्मनाबाद(धाराशिव) जवळच्या पारध्यांच्या पालाभोवती आकाराला येते. पारध्यांचा पाल म्हटले, की नजरेसमोर केवळ ‘पारधी’ येतात. माञ पारध्यांमध्येदेखील अनेक जाती पाहायला मिळतात. फासेपारधी, चित्तापारधी, गायपारधी, पालपारधी, नकलू, चिंचेर, पिटिलू, कुरा, कुराविकरन, हिक्की पिक्की अशा बऱ्याच जाती आहेत.
त्यातील गायपारध्यांच्या जीवनावर ही कथा बेतलेली आहे. पिढ्यानपिढ्या गायपारध्यांची उपजीविका गाईंच्या जीवावर चालत आलेली आहे. गायपारध्यांचं पोट गाय पाळते, तर गाईचं पोट गायपारधी पाळतात. असं हे परस्पर सहकार्याचं जिणं गायपारधी पिढ्यानपिढ्या जगत आलेला आहे. 2014 साली केंद्रात उजव्या विचारसरणीचं बीजेपीचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर गाईचं राजकारण (cow politics) उत्तर भारतात जोर धरू लागलं. त्याचं लोण काही कालावधीतच इतर राज्यांत पसरत गेलं. 2015 साली ‘गोहत्या बंदी कायदा’ अस्तिवात आला.
2018 साली सदर कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याला ह्या ‘गोहत्या बंदी कायदा’ अस्तित्वात आल्यानंतर निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीची पार्श्वभूमी आहे. हा कायदा तयार झाल्यानंतर गोपालन करणारे शेतकरी, मुस्लिम समाज यांच्यावर झालेल्या दुष्परिणामांविषयी चर्चा होताना दिसली. माञ इथल्या समाजाच्या परिघाबाहेर फेकल्या गेलेल्या भटक्या-विमुक्त जातींमधील गाईंवर आधारित जीवन जगणाऱ्या ह्या गायपारध्यांच्या आयुष्यात काय खळबळ माजली असेल, याचं चित्रण ह्या कथेतून लेखक करून देतात.
स्थानिक राजकारणी स्वतःच्या स्वार्थापोटी कशाप्रकारे गाईच्या राजकारणाला उत्तेजन देऊ पाहतात आणि ह्या राजकारणात गरीब बिचाऱ्या गायपारध्यांची कशी होरपळ होते, याचं हृदयद्रावक चित्रण ह्या कथेतून लेखकांनी करून दिलं आहे.
त्यानंतरची आणि शेवटची कथा आहे, ‘ स्मारक’. वरील दोन कथांप्रमाणेच ही कथादेखील स्थानिकपातळीवरील राजकारणाभोवतीच फिरताना दिसते. सामजिक, राजकीय आणि आर्थिक स्वार्थापायी सांस्कृतिक राजकारण कसे जन्माला येते, याचे उत्तम चित्रण या कथेतून आपल्याला पाहायला मिळते. आपला समाज कशाप्रकारे निर्बुद्धपणे बुवाबाजी आणि स्मारकांच्या राजकारणाला फशी पडतो, आणि त्यातून स्थानिक भ्रष्ट राजकारण्यांचं कसं फावतं, हे सदर कथेतून अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने चितारले आहे.
ही कथा घडते ती नाशिकजवळच्या 20-25 किमी अंतरावरील एका गावात. जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन या गावात बुवाबाजी बोकाळते. भ्रष्ट राजकारणी आणि बुवाबाजी करणाऱ्या लोकांचा हातात हात घालून समाजाला नागवण्याचा खेळ पूर्वापारपासून चालत आलेला आहे. त्यातून इथे अस्मितेचे राजकारण, स्मारकांचे खेळ, नावांचे राजकारण, प्रादेशिकवाद कसा आकाराला येतो हे या कथेतून चांगल्याप्रकारे चित्रित केले आहे.
पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.