शांतता! कोर्ट चालू आहे (Shantata! Court Chalu Ahe)
‘शांतता! कोर्ट चालू आहे’ हे नाटक प्रसिध्द नाटककार विजय तेंडुलकर यांनी 1967 साली लिहिलं. 20 डिसेंबर 1967 रोजी राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाचा पहिला प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर येथे झाला. ‘हे नाटकच नाही’ असे म्हणत राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षकांनी पहिल्या फेरीतच त्याला बाद करून टाकले होते. मात्र पुढील काळात ह्या नाटकाने रंगभूमीवर इतिहास घडवला. मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेले हे नाटक मराठी, हिंदीसह इतर 16 भाषांमध्ये रंगभूमीवर सादर झाले आहे. मराठी, हिंदी तसेच इंग्रजीसह इतर परदेशी भाषांमध्ये देखील ह्या नाटकावर आधारित चित्रपट बनवण्यात आलेले आहेत. विजय तेंडुलकर यांनी 1970 च्या दशकात ह्या नाटकाची संहिता लिहिली, मात्र आज इतका काळ उलटल्यानंतरही त्यातील आशय आपल्या सामाजिक व्यवस्थेला अजूनही लागू होत आहे ही एक सामाजिक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
1971 साली सत्यदेव दुबे यांनी ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ याच नावाने चित्रपट बनवला आहे. सुप्रसिध्द अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटातील ‘मिस. लीला बेणारे’ या मुख्य पात्राची भूमिका अत्यंत समर्थपणे निभावली आहे. ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ हा चित्रपटात सादर केलेला एक नाटकाचा प्रयोग आहे, जो पितृसत्ताक समाजातील स्त्रियांचे स्थान आणि सामाजिक दांभिकता यावर नेमके भाष्य करतो. एका स्त्रीवर मॉरल पोलिसिंग करुन तिला तिची जागा दाखवून देण्याचा समाजाने केलेला एक क्रूर प्रयत्न म्हणजे ह्या चित्रपटाचे सर्वसाधारण कथानक आहे.
शहरातील काही हौशी नाटक मंडळी एका खेडेगावात त्यांच्या नाटकाचा प्रयोग करायला जातात. नाटकातील चौथ्या साक्षीदाराचं काम करणारा एक कलाकार गैरहजर राहिल्यामुळे त्याच्या जागेवर एका नवीन व्यक्तीला ते काम करायला लावायचं असं ते नाटक मंडळी ठरवतात. त्या नवीन व्यक्तीला कोर्टाचं काम कसं चालतं याविषयी काहीच कल्पना नसते. तेव्हा ती सर्व मंडळी ठरवतात की रात्रीच्या मुख्य नाटकाच्या कार्यक्रमाला अजून भरपूर वेळ आहे, तोवर आपण नाटकाची रंगीत तालीम करूयात जेणेकरून नवीन व्यक्तीला कोर्टाचं काम कसं चालतं याची एक कल्पना येईल. परंतु मुख्य नाटकाची इतक्यांदा रंगीत तालीम केली आहे, की अजून एकदा केली तर रात्रीचा मुख्य नाटकाचा प्रयोग करताना कंटाळा येईल असे सर्वांना वाटते. त्यापेक्षा आपण एक विरंगुळा म्हणून एखादा नवीनच विषय घेऊन कोर्टात खटला कसा चालतो याची रंगीत तालीम करावी असं सर्वानुमते ठरतं.
भ्रूणहत्येचा विषय घेऊन बेणारे बाईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करूयात असं पोंक्षे इतरांना सुचवतो. मिस. लीला बेणारे ही एक स्वच्छंदी, मुक्तपणे जगणारी, पुरुषांशी मनमोकळा संवाद साधणारी आणि लग्नाचं साधारण वय उलटून गेलेली एक अविवाहित अशी स्त्री आहे. अशा स्त्रियांकडे समाज कुठल्या नजरेने पाहतो हे आपणा सर्वांना परिचितच आहे. ह्या नाटक मंडळीत इतर सर्व पुरुष असून मिस. बेणारे आणि मिसेस. काशीकर या दोनच स्त्रिया आहेत. वरील भ्रूणहत्येचा विषय ऐकून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहण्यास मिस. बेणारे नकार देतात. नाटकाचा खेळच तर आहे, त्यात काय एवढं असं म्हणून सर्वजण तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहण्यास भाग पाडतात.
गंमत आणि खेळ म्हणून सुरू झालेला हा प्रयोग हळूहळू गंभीर होत जातो. ही नाटकाची रंगीत तालीम नसून आपल्याभोवती टाकलेला एक क्रूर फास आहे, हे लक्षात यायला मिस. बेणारेंना वेळ लागत नाही. नाटकाच्या नावाखाली सर्वजण आपल्या वैयक्तिक आयुष्यावर टीकाटिपण्णी करत आपल्याला खऱ्या आयुष्यातील एक आरोपी सिद्ध करू पाहत आहेत, हे लक्षात आल्यावर मिस. बेणारे तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची दारं बंद झाली आहेत, हे बेणारे बाईंच्या लक्षात येते. मिसेस. काशीकर मिस. बेणारेंना जबरदस्तीने ओढत आणतात आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहण्यास भाग पाडतात.
मिस. बेणारे या एका शाळेत काम करणाऱ्या शिक्षिका आहेत. तिथल्याच वयाने मोठे असलेल्या प्रोफेसर दामले या विवाहित पुरुषाबरोबर त्यांचे प्रेमसंबंध असतात. त्या प्रेमसंबंधातून त्या गरोदर राहिलेल्या असतात. गरोदर बेणारेंना दामले नाकारतात, पण मिस. बेणारेंना गर्भपात करायचा नाही, त्यांना ते मूल हवे आहे. त्यासाठी लवकरात लवकर कुणाशीतरी विवाह करावा असे त्यांनी ठरवले आहे. गरोदर असण्याची गोष्ट लपवून न ठेवता मिस. बेणारे पोंक्षेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. जो प्रस्ताव पोंक्षेंनी नाकारलेला असतो. तरीही मिस. बेणारेंना तिची जागा दाखवून द्यायची आयती संधी चालून आलीय असं हेरून पोंक्षे या रंगीत तालमीच्या निमित्ताने बेणारे बाईचं खाजगी गुपित चारचौघात उघड करतात.
नाटकातील सर्व साक्षीदार आपापल्यापरीने तिखट मीठ लावून मिस. बेणारे यांचं चालचलन कसं वाईट आहे याच्या खुमासदार कथा रचून साक्षी देतात. एखाद्या अविवाहीत स्त्रीने विवाहित पुरुषावर प्रेम केल्यास किंवा त्यानंतर ती गरोदर राहिल्यास तो विवाहित पुरुष त्याला हवं तेव्हा त्यातून बिनदिक्कतपणे नामानिराळा होऊ शकतो. पण ती स्त्री मात्र त्यात भरडली जाते. दामले बेणारेंना गरोदर करून हात वर करून निघून जातात, पण मिस. बेणारे त्यानंतरही गर्भातलं मूल वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. कुण्या पुरुषांनी त्यांच्याशी लग्न करून आपल्या मुलाचा स्वीकार करावा यासाठी त्या धडपडत असतात. एवढेच नव्हे तर गरज पडल्यास आत्महत्येची तयारी ठेवून बॅगेत विषारी औषधाची बाटली घेऊन फिरत असतात.
मिस. बेणारे अशा कात्रीत सापडलेल्या अवस्थेत असल्या तरीही त्यांच्या दैंनदिन कामात, त्यांच्या उत्साहात तसूभरही कमीपणा आलेला नाही. अजूनही त्या खळखळून हसतात, प्रसंगी विनोद करून समोरच्याची जिरवतात, सर्व पुरुषांशी मनमोकळ्या गप्पा मारतात, ही गोष्ट त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना सहन होत नसते. या बाईने मातृत्वाला काळीमा फासला आहे, घरंदाज स्त्रीचे कुठलेच लक्षण हिच्यात दिसत नाही, त्यामुळे तिला आनंदी राहण्याचा आणि सुखी होण्याचा काहीएक अधिकार नाही अशी भावना तिच्या आजूबाजूच्या लोकांच्या जाणीवे-नेणीवेत पक्की बसलेली आहे. त्यातूनच नाटकाची रंगीत तालीम करण्याचा जेव्हा विषय निघतो, तेव्हा बेणारे बाईला आरोपी करण्यामागे सर्व मंडळींचा काय सुप्त हेतू असावा हे स्पष्ट होते.
रंगीत तालमीसाठी उभं केलेलं ते नाटकातलं कोर्ट आपल्या पितृसत्ताक सामाजिक व्यवस्थेचंच प्रतिनिधित्व करतं. नाटकातलं कोर्ट काय किंवा लोकशाही व्यवस्थेतील न्यायदान करणारं खरं कोर्ट काय, अशा पितृसत्ताक सामाजिक व्यवस्था असणाऱ्या समाजात मिस. बेणारेंसारख्या स्त्रियांना नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले जाते. या पितृसत्ताक समाजातील स्त्रिया या स्वतः शोषित घटक असल्या तरी या व्यवस्थेच्या वाहकदेखील असतात, हे मिसेस. काशीकरांच्या उदाहरणावरून लक्षात येते. पितृसत्ताक व्यवस्थेतील तथाकथित घरांदाजपणा मिरवल्यामुळे मिस. बेणारे यांच्या वाट्याला येणारी तुच्छता मिसेस. काशीकरांच्या वाट्याला येत नाही. पण नाटकात जज झालेले मिस्टर काशीकर हे पावलोपावली पत्नी मिसेस. काशीकर यांचा सर्वांसमक्ष अपमान करत असतात हेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे.
चौथा साक्षीदार म्हणून ज्या नवीन व्यक्तीस कोर्ट प्रोसिडिंग लक्षात येण्यासाठी रंगीत तालीमीचा खेळ चालवला होता, तो इसम म्हणजे सामंत. या सामंतच्या हातात संपूर्ण चित्रपटात एक खेळण्यातील पोपट दाखवलेला आहे. खरेतर बेणारे बाईशी जो काही थोडासा परिचय झाला होता, त्यावरून सामंतचे त्यांच्याविषयी चांगले मत तयार झाले होते. पण रंगीत तालमी दरम्यान सामंत इतरांचं अनुकरण करत त्यांच्याही नकळत त्या क्रूर खेळात आपसूक सहभागी होतात. सामंतच्या हातातील पोपट इथे प्रतिकात्मक स्वरूपात दाखवला आहे. सामंत समाजातील अशा प्रवृत्तींच्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात, जे सामाजिक मुद्द्यांवर योग्य भूमिका न घेता इतर बहुसंख्यांकांचं अनुकरण करतात.
मिस. बेणारेंच्या चारित्र्यावर आणि खाजगी आयुष्यावर चहूबाजूंनी चाललेला हल्ला पाहून महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाची आठवण यावी असा तो प्रसंग आहे. शेवटी मिस. बेणारे छिन्नविच्छिन्न होऊन जमिनीवर कोसळतात. त्यावेळी ‘अरे, यात काय एवढं! नाटकाची रंगीत तालीमच तर होती. त्यात काय मनाला लावून घेण्यासारखं? ही तर खूपच हळवी आहे.’ असं म्हणून सर्व मंडळी रात्रीच्या मुख्य नाटकाच्या तयारीला लागतात. हा प्रसंग मानवी स्वभावातील दांभिकता प्रकर्षाने दर्शवते.
विजय तेंडुलकर यांच्या नाटकावर आधारित या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन सत्यदेव दुबे यांनी केले आहे. विजय तेंडुलकर आणि सत्यदेव दुबे यांनी मिळून चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, अमोल पालेकर, विनोद दोशी, एकनाथ हतंगडी, सरोज तेलंग, नारायण पै, अरविंद कारखानीस, अरुण काकडे यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका असून, अमरीश पुरी यांनी पाहुणा कलाकार म्हणून काम केलेले आहे.