The Patience Stone, 2012

दिग्दर्शक ऑथक रहिमी यांच्या ‘संगे सबुर’ (Syngué sabour) ‘The Patience Stone’ या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झालेला आहे. ‘संगे सबुर’ (संयमाचा दगड) ही एक पर्शियन दंतकथा आहे. या दंतकथेनुसार एक विशिष्ट प्रकारचा दुर्मिळ जादुई दगड एखाद्या व्यक्तीला सापडला तर तो त्याचे दुःख, वेदना आणि इतकंच काय तर मनातील गुपिते देखील त्या दगडाला सांगू शकतो. हा दगड संयमाने तुमची सर्व म्हणणं ऐकून घेईल. स्वतःजवळ तुमची सर्व गुपितं सुरक्षित ठेवेल. एकवेळ अशी येईल सर्व दुःख, वेदना, गुपितं साठवून ठेवलेल्या ह्या दगडाची आणखी काही ऐकून घेण्याची क्षमता संपेल. त्यावेळी तो भंग पावेल, त्याच्या अगदी ठिकऱ्या ठिकऱ्या होतील. अशावेळी त्या व्यक्तीची दुःख, वेदनांपासून मुक्ती होईल.

खरंतर चित्रपटात ना कुठल्या पात्रांच्या नावाचा उल्लेख आहे, ना कुठल्या प्रदेशाचा उल्लेख आहे. पण हे मध्य आशियातील एखादे इस्लामिक राष्ट्र असावे असा अंदाज आपण सहज लावू शकतो. या इस्लामिक राष्ट्रातील यादवी गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा आकाराला येताना दिसते.

चित्रपटाची मध्यवर्ती पात्र असणाऱ्या नायिकेचा पती या गृहयुद्धात मानेत गोळी लागल्यामळे कोमात गेलेला आहे. कट्टर इस्लामिक राष्ट्रासाठी लढणारा मध्यम वयाचा हा सैनिक जेव्हा जखमी होऊन कोमात जातो, त्यावेळी ना युद्धातले त्याचे साथी मदतीला येताना, ना त्याचे स्वतःचे कुटुंबीय. सगळे त्याला सोडून निघून जातात. कोमात गेलेला पती, दोन लहान मुली, हातात एक पैसा नाही, आणि घराबाहेर युद्ध चालू. अशा परिस्थितीत नायिका अगदी हतबल झालेली आहे. औषधं, सलाईन आणण्यासाठी सुद्धा पैसे नाही, मेडिकलवाला उधार औषध देत नाहीये, अशा परिस्थितीत नवऱ्याला जगवण्याचे आव्हान तिच्यापुढे आहे.

अचानक गायब झालेल्या मावशीला शोधून काढण्यात अखेर नायिकेला यश येते. वेश्यव्यवसाय करणाऱ्या मावशीकडे आपल्या दोन लहान मुलींना ठेवून कशीतरी परिस्थिती सावरण्याचा तिचा प्रयत्न चालू असतो. या सर्व काळात आपल्या कोमात गेलेल्या पतीला ती रोजच्या घडामोडी सांगायला सुरुवात करते. आयुष्यात पहिल्यांदाच ती काहीतरी सांगतेय आणि नवरा ते सर्व निमूटपणे ऐकून घेतोय, याची तिला जाणीव होते. लग्नानंतरच्या गेल्या दहा वर्षात असं कधीच झालं नव्हतं.

तिची सुखं-दुखं, तिच्या बालपणीच्या आठवणी, मनाच्या खोलवर दडवून ठेवलेली गुपिते आजवर तिने कुणालाच सांगितली नव्हती. पण आता ती सर्व तिला नवऱ्याला सांगावीशी वाटत होती. नवरा कोमात जरी असला तरी तो तिचं म्हणणं त्याला ऐकू जातंय, याची तिला मनोमन खात्री होती. हे सर्व ऐकून कोमातून बाहेर आल्यावर कदाचित तो तिचा जीव घेईल किंवा त्याच्या उलट मनाने तिच्या खूप जवळ येईल अशी भाबडी आशा देखील तिला वाटतेय.

या काळात एक तरुण सशस्त्र सैनिक तिच्यावर बलात्कार करतो. मात्र त्याच्या शरीराची भूक आणि तिची पैशाची गरज त्यांना आणखी जवळ घेऊन येते. लग्नानंतरच्या दहा वर्षात जे शारीरिक सुख तिला कधीच मिळाले नव्हते, ते ह्या तरुणाकडून मिळवण्यात ती यशस्वी होते. एरवी ती तिच्या नवऱ्याकडे तिला हव्या तशा प्रकारच्या शारिरीक संबंधाची मागणी कधीच करू शकली नाही. त्याच्यासाठी ती केवळ मांसाचा गोळा असते, तिच्या मनाचा, तिला हवं नको असणाऱ्या गोष्टींचा त्याने कधीच विचार केलेला नसतो. मात्र आज ती त्या सैनिक तरुणासमवेतच्या प्रणयाच्या सर्व गोष्टी त्याला सांगत आहे. इतकेच काय तर तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित म्हणजे तिच्या दोन मुली देखील तिला नवऱ्यापासून झालेल्या नाहीत, हेही त्याला सांगते.

sange saboorबाहेर युद्ध चालू असताना सर्वत्र अनागोंदी माजली असताना देखील, नायिका मात्र आयुष्यात पहिल्यांदाच स्वातंत्र्याची अनुभूती घेतेय. ती मनातलं सर्व काही बोलतेय आणि तिचा नवरा गप्प सर्व ऐकून घेतोय. तिच्या सर्व त्रासाला, दुःखाला तोच जबाबदार आहे, याची तिला कल्पना आहे. मात्र तरीही तिने त्याच्याविषयी मनात कटुता येऊ दिलेली नाही. तिला अजूनही त्याचं प्रेम हवंय. तो बरा व्हावा यासाठीची तिची धडपड अजूनही थांबलेली नाही. त्याला अशा अवस्थेत सोडून जावू शकत नाही, त्यामुळे घर युद्धाच्या केंद्रस्थानी असून देखील ती अजूनही तिथेच त्याच्यासोबत आहे. इतक्या भयंकर कठीण परिस्थतीत नायिकेने मनाचा दाखवलेला खंबीरपणा, निःस्वार्थ प्रेम, माणुसकी जपणारी मूल्ये सिनेमा पाहताना आपल्या मनाला भावून जातात.

तिची सर्व सुखं-दुःख, गुपिते, चांगल्या-वाईट आठवणी तिच्या ‘संगे सबुर’ने म्हणजेच तिच्या कोमात गेलेल्या नवऱ्याने दगडाप्रमाणे स्तब्ध राहून ऐकून तर घेतल्या आहेत, पण शेवटी कोमातून बाहेर आल्यावर खरचं का हा ‘संगे सबुर’ (The Patience Stone) तिची सर्व त्रासातून मुक्तता करेल? पितृसत्ताक समाजातील स्त्रियांचे पुरूषकेंद्री अस्तित्व, त्यांच्या वाट्याला येणारे दारुण दुःख याचे प्रभावी चित्रण ऑथक रहिमी यांनी केले आहे आणि ओलशिफ्ते फाराहानी या नायिकेने तितक्याच ताकदीने तिची भूमिका साकारली आहे. आवर्जून पहावा असा हा सिनेमा आहे.

  • दिग्दर्शक – ऑथक रहिमी ()
  • प्रमुख भूमिकाः ओलशिफ्ते फाराहानी (), हमिदरेझा जॉवदान (), हसिना बुर्गान (), मासी मोर्वात (Massi Mrowat)

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *