डिमार्टचे मालक राधाकिशन दमानी यांचा शून्यापासून विश्व उभारण्याचा प्रवास!!!

देशातील प्रत्येक शहरात डी मार्टचे रिटेल शो रूम्स असतात. देशातील सर्वाधिक लोकप्रिय रिटेल सुपरशॉप्स म्हणून त्यांचे वर्णन करता येईल. डी मार्टमध्ये इतर सुपरशॉप्सपेक्षा कमी किमतीत सामान मिळतो म्हणून देखील डी मार्ट लोकप्रिय आहे. डी मार्टचे मालक राधा किशन दमानी यांनी शून्यातून विश्व उभे करत आज अब्जावधींचे साम्राज्य उभे केले आहे. फोर्ब्सनुसार दमानी हे आजच्या घडीला देशातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. आजवरचा त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी असाच राहिला आहे.

दमानी यांचे वडील हे बॉल बेयरिंगचा व्यवसाय करत असत. पण त्यात यश न मिळाल्याने हा व्यवसाय बंद पडला. राधाकिशन यांनी अकौंटिंग मध्ये आवड असल्याने मुंबईतून कॉमर्समध्ये पदवी घेतली होती. पुढे त्यांनी आपल्या भावाच्या सोबतीने शेयर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केली. चांगली संधी शोधायची आणि लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची ही पद्धत त्यांनी अवलंबली होती.

दमानी आजजरी डी मार्टमुळे अधिक प्रसिध्द असले तरी त्यांची मूळ ओळख ही शेयर मार्केटमधील ट्रेडर अशीच आहे. शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची त्यांची विशेष पद्धत सांगितली जाते. ती म्हणजे,

1) एखाद्या कंपनीत पैसे लावण्याआधी तिच्यावर असलेल्या कर्जाचा अभ्यास करणे

2) कमी कालावधीसाठी पैसे लावण्यापासून बचाव करणे.

3) एकाच क्षेत्रातील कंपनीत पैसे गुंतवण्यापेक्षा विविध क्षेत्रांवर लक्ष ठेवणे.

4) शेयर विकत घेण्याआधी तो केव्हा विकायचा याचा विचार करून ठेवणे.

5) बाजारात उतरण्याआधी आपल्याला किती रुपये गुंतवायचे आहेत याचा विचार करून ठेवणे.

तर या पद्धतीची गुंतवणूकीची सूत्रे ते सांगत असतात.

दमानी यांनी शेयर मार्केटमध्ये हळूहळू करत चांगला पैसा कमावला. 90 च्या दशकात त्यांनी हा पैसा इतर ठिकाणी गुंतवण्याचे ठरवले. 2002 साली त्यांनी रिटेल क्षेत्रात उतरण्याचे निश्चित केले. हा तो काळ होता जेव्हा फ्युचर ग्रुपचे किशोर बियाणी आणि कुमार बिर्ला हे देखील यात उतरले नव्हते.

21 मार्च 2017 रोजी त्यांनी कंपनी लिस्ट केली. डिमार्टचा शेयर 604.40 रुपयांवर लिस्ट झाला. तर इश्यू प्राईज 299 रुपये ठेवण्यात आली. जेव्हा डी मार्ट लिस्ट झाली तेव्हा त्यांची एकूण संपत्ती ही 40 हजार कोटी रुपये होती. पुढे एकाच वर्षात ही संपत्ती तब्बल 93 हजार कोटी रुपये झाली. एकाच वर्षात दुपटीने त्यांची संपत्ती वाढली होती. आता त्यांची संपत्ती ही एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.

एवढी श्रीमंती असतानाच हजार कोटींचे घर घेणे त्यांच्यासाठी काहीही विशेष नाही असेच म्हणावे लागेल. राधाकिशन दमानी यांच्याकडे तंबाखू पासून बियर बनविणाऱ्या कंपन्यांचे शेयर्स आहेत. त्यांचा अलिबाग येथे 156 खोल्यांचा ब्ल्यू रिसॉर्ट देखील आहे. भारताचे वॉरन बफे समजले जाणारे राकेश झुणझुणवाला देखील दमानी यांना आपला गुरू समजायचे यावरून दमानी यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येईल.

दमानी हे मोठे निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यासाठी मोठी जोखिम घेण्यास देखील ते तयार असतात. मागील दोन दशकांचा त्यांचा प्रवास बघितला तर जोखीम घेतली आणि फायदा झाला हेच त्यांच्या बाबतीत घडले आहे. थोडक्यात काही दिवसांपूर्वी आलेल्या हर्षद मेहता सिरीजमधील रिस्क है तो इष्क है हे वाक्य त्याना बरोबर फिट होत आहे. मुंबईच्या एका सामान्य घरातून आलेल्या या मुलाकडे बघून आज लाखो तरुण उद्योजक होण्याची प्रेरणा घेत असतात.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *