Hydroponic Farming – मातीविना शेती करण्याची एक भन्नाट आयडिया
हवामानबदल, वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली अशा घटकांमुळे पारंपारिक पद्धतीने शेती करणे अवघड होत चालले आहे. पारंपारिक शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या साथीने शेतीमध्ये नवीन प्रयोग केले जात आहेत. त्यातलाच एक नवीन प्रयोग म्हणजे ‘हायड्रोफोनिक शेती’ (Hydroponic Farming) होय.
Hydro म्हणजे पाणी आणि Ponic म्हणजे कार्यरत करणे होय. म्हणजेच केवळ पाण्याच्या साहाय्याने मातीविना शेती करण्याची पद्धत म्हणजे ‘हायड्रोफोनिक शेती’ (Hydroponic Farming) होय. या प्रकारच्या शेतीमध्ये वनस्पतींसाठी आवश्यक असणारी पोषणद्रव्ये मातीचा वापर न करता पाण्याद्वारे पुरवली जातात.
‘हायड्रोफोनिक शेती’ (Hydroponic Farming) करण्याची पद्धती –
या प्रकारच्या शेतीपद्धतीमध्ये पीव्हीसी पाईपचा वापर करून शेती केली जाते. पाईप ची लांबी १९७ सेंमी, व्यास १६ सेंमी आणि उतार ४ अंश या प्रमाणात असतो. पाईपच्या वरच्या बाजूस छिद्रे करून त्यात रोपे लावली जातात. रोपांना आवश्यक पोषकद्रव्ये पाण्यात विरघळवले जातात. पाईपमधून हे पाणी वाहते आणि पाईपच्या वरील छिद्रात लावलेल्या रोपांच्या मुळांना हे पाणी मिळते. छोट्या वनस्पती असणाऱ्या पिकांसाठी हे तंत्रज्ञान चांगले उपयुक्त ठरते.
हायड्रोपोनिक शेतीचे प्रकार –
- ऐक्टिव पद्धत
– या प्रकारात पाण्याच्या सहाय्याने पिके घेतली जातात. पाण्याचे रिसायकलिंग (पुन्हा पुन्हा वापर) केले जाते. ऍक्टिव्ह पद्धतीमध्ये पिकांची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. पाणी एकसमान वितरीत करण्यासाठी पंपाचा वापर केला जातो. या प्रणालीद्वारे जलद वाढ आणि उच्च उत्पन्नाचा फायदा मिळतो.
- पॅसिव्ह पद्धत
– या पध्दतीत हायड्रोस्टोन व कोकोपीटचा वापर करून पिके घेतली जातात. कोकोपीट हे नारळाच्या केसरापासून बनवतात. या दोन्ही पद्धतीमध्ये झाडाला आवश्यक घटक पुरवले जातात.
हायड्रोपोनिक तंत्राद्वारे घेतली जाणारी पिके –
उपलब्ध जागेचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पिकांची लागवड या तंत्राद्वारे केली जाते. या शेती पद्धतीत गाजर, सलगम, मुळा, सिमला मिरची, वाटाणा, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, टरबूज, अननस, सेलेरी, तुळस, टोमॅटो, भेंडी, औषधी वनस्पती, पालक, काकडी, लांब दांड्याची फुले इ. रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात.
हायड्रोपोनिक शेतीचे फायदे –
हायड्रोपोनिक शेतीपद्धतीत पारंपारिक शेतीच्या तुलनेत 10% कमी पाणी लागते. म्हणजेच या शेतीमधून 90% पाण्याची बचत होते. त्यामुळेच पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या ठिकाणी हायड्रोपोनिक शेती वरदान ठरू शकेल.
ह्या शेतीपद्धतीतील आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे ही शेती आपण कमी जागेत देखील करू शकतो. अगदी घराच्या बाल्कनीत देखील आपण पिकांची लागवड करू शकतो. लहान आकाराची फळे किंवा भाजीपाला पिकवला तर खूप कमी जागेत भरपूर पिके घेता येतात. केवळ १०० चौरस फुट जागेत २०० रोपे लावता येतील.
हायड्रोपोनिक शेतीपद्धतीतील गुंतवणूक आणि नफ्याचे गणित –
100 स्क्वेअर फूट जागेमध्ये हायड्रोपोनिक यंत्रणा बसवायची असेल तर जवळपास 50-60 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. या शेती तंत्रज्ञानासाठी सुरुवातीला करावी लागणारी गुंतवणूक जरी जास्त असली, तरी मिळणारे फायदे हे दीर्घकालीन आणि मुबलक असतात. या तंत्रज्ञानाद्वारे 100 चौरस फुटांमध्ये 200 रोपे वाढवली जातात. जर जागा कमी असेल तर त्यानुसार लहान आकारातील हायड्रोपोनिक प्रणाली सेट देखील बनवले जाऊ शकतात. हायड्रोपोनिक हे तंत्रज्ञान घरी भाज्या आणि फळे पिकवण्यासाठी सर्वोत्तम आहे. आजकाल घरच्या घरी शेती करून भरपूर नफा मिळवून देणारा उद्योग म्हणूनही या शेती पद्धतीकडे पाहिले जात आहे. त्यासाठी स्ट्रॉबेरी, लेट्युस यांसारखे सॅलड किंवा तत्सम जास्त नफा देणाऱ्या आणि कमी कालावधीत लागवड होऊ शकणाऱ्या भाज्या पिकविल्या तर त्यामधून अधिक नफा मिळू शकतो. बिझनेसचा नवा पर्याय शोधत असणाऱ्या तरुणाईसाठी अगर प्रौढांसाठी देखील हायड्रोपोनिक शेती हा एक उत्तम पर्याय आहे.