Where Is the Friend’s Home? (1987) – मराठी रिव्ह्यू

Abbas KiarostamiWhere is the Friend’s home? म्हणजेच ‘कुठे आहे मित्राचे घर?’ हा इराणमधील प्रसिध्द लेखक आणि दिग्दर्शक अब्बास कियारोस्तामी (Abbas Kiarostami) यांचा एक लोकप्रिय इराणी सिनेमा आहे. Koker Trilogy या चित्रपट त्रयीमधला हा पहिला चित्रपट. हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपट त्रयीतील पुढील चित्रपट म्हणजे ‘And Life Goes On’ आणि ‘Through The Olive Trees’ हे चित्रपट अनुक्रमे 1992 आणि 1994 साली प्रदर्शित झाले. उत्तर इराणमधील कोकेर या खेड्याच्या आसपासच्या परिसरात ह्या चित्रपटांचे चित्रीकरण केले आहे. Where is The Friend’s home?(1987) या प्रस्तुत चित्रपटाचे कथानक अहमद (Babak Ahmadpour) ह्या छोट्या नायकाभोवती फिरते. 

सोहराब सेपेहरी (Sohrab Sepehri) यांच्या Where is The Friend’s home? या कवितेतून प्रेरणा घेत त्याच नावाचा हा चित्रपट अब्बास कियारोस्तामी (Abbas Kiarostami) यांनी बनवला आहे. लहान मुलांच्या निरागस भावविश्वाचे वास्तवदर्शी चित्रण ह्या सिनेमातून अब्बास कियारोस्तामी यांनी घडवले आहे. आठ वर्षांचा अहमद शाळेतून घरी येताना चुकून आपल्या मित्राची वही दप्तरातून आपल्या घरी घेऊन येतो. घरी आल्यावर शाळेचा गृहपाठ करायला बसल्यावर ही चूक त्याच्या लक्षात येते. दिलेला गृहपाठ गृहपाठाच्या वहीत न केल्यामुळे अगोदरच अहमदच्या मित्राने शाळेत खूप ओरडा खाल्लेला आहे. ‘उद्या जर गृहपाठ वहीत केला नाहीस तर तुला वर्गातून बाहेरच काढेल,’ असा दम शिक्षकांनी त्याला भरला होता. हे सर्व आठवून अहमद खूप बैचेन होतो, आज कुठल्याही परिस्थितीत मित्र मोहम्मदची वही त्याला परत करायलाच हवी, असे अहमद ठरवतो. ‘मित्राची वही परत करण्यासाठी त्याचं घर शोधण्याचा अहमदचा प्रवास’ म्हणजे या चित्रपटाचे कथानक आहे. 

where is the friend's home?वरवर पाहिलं तर हे वाचून वाटेल, की यात काय विशेष? मित्राचं घर शोधून त्याची वहीच तर परत करायची आहे, यात काय मोठं नवल? पण अब्बास कियारोस्तामी या दिग्दर्शकाचे तेच तर कसब आहे, जे त्यांना जागतिक सिनेविश्वात एक प्रतिभासंपन्न दिग्दर्शक म्हणून दखलपात्र ठरवते. घटना, पात्र, प्रसंग, संवाद, कथानक यात कुठलाही अतिरंजितपणा, अतिशयोक्तीपणा न आणता अब्बास कियारोस्तामी अगदी रोजच्या साध्या प्रसंगांनी, पात्रांच्या सध्या संवादातून, त्यांच्या हावभावातून आणि कॅमेऱ्याच्या अचूक अँगलमधून नेमकी आशयनिर्मिती घडवून आणतात. 

प्रस्तुत Where Is The Friend’s home? (कुठे आहे मित्राचे घर?) या  सिनेमात कोकेर या छोट्याशा गावातील अहमद जेव्हा त्याच्या मित्राची वही परत करायचे ठरवतो, तेव्हा त्याला इतकेच माहीत असते आपला मित्र पोश्तेह नावाच्या शेजारच्या गावात रहात आहे. याव्यतिरिक्त त्याच्या घराचा पत्ता वगैरे काहीच ठाऊक नसते. वही परत करण्यासाठी पोश्तेहला जायचे आहे असे अहमद सर्वप्रथम आपल्या आईला सांगतो. अगोदर ती बराचवेळ त्याच्याकडे लक्षच देत नाही, ती तिच्या कामात मग्न असते. शेवटी प्रयत्न करून अहमद आपल्या आईचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतो. तेव्हा त्याची आई स्पष्ट शब्दात ‘ते गाव लांब आहे, तू तिकडे जायचं नाहीस’, असं सांगते. अहमद केवळ अभ्यास चुकवायचा म्हणून बहाणे शोधतोय, असं बोलून ती परत तिच्या कामाला लागते. 

where is the friend's home?अहमदचं वय पाहता त्याच्यासाठी ‘ती वही मित्राला परत करणं किती गरजेचं आहे’, हे आईला पटवून देणं तशी सोपी बाब नाही. दुर्दैवाने मानवी समाजात लहान मुलांना, त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या भावनांना तितकं गांभीर्याने घेतलं जात नाही. ही बाब अब्बास कियारोस्तामी यांनी अचूक हेरली आहे. संपूर्ण चित्रपटात ही बाब सातत्याने अधोरेखित होत राहते. लहान मुलांच्या प्रत्येक कृतीकडे केवळ उनाडपणा म्हणून पाहण्याची सवय प्रौढांना असते. मात्र अहमदच्या मनातील त्याच्या मित्राविषयीचे प्रगाढ प्रेम, त्याला शाळेत शिक्षा होऊ नये म्हणून वाटणारी काळजी, आपण जर चुकून मित्राची वही घेऊन आलोय, तर ती परत करण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे याचे भान… या सर्व गोष्टी कियारोस्तामीच्या नजरेतून प्रेक्षक पाहतो. 

where is the friend's home?आईने वही परत करण्यासाठी पोश्तेह गावात जाण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे. मात्र अहमदला त्याच्या जबाबदारीचे भान स्वस्थ बसू देत नाही. तो घरात कुणालाही न सांगता पोश्तेहला जायला निघतो. वाटेत त्याचे आजोबा, इतर प्रौढ गावकरी लोक एकतर त्याच्या प्रवासात अडथळे आणतात, नाहीतर आपल्या कृतीमधून अहमदच्या अडचणी अजून वाढवतात. तो मोठ्या माणसांकडून जेव्हा जेव्हा काही मदत घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा सर्वांकडून त्याला दुर्लक्षिलं जातं. पोश्तेहला पोहचल्यावर मित्र मोहम्मदचे घर शोधणे हे एक मोठेच दिव्य असते. पोश्तेह गावातील छोट्या-मोठ्या गल्लीबोळातून चकरा मारत मित्राचे घर शोधताना सूर्य मावळून अंधार कधी पडतो, हे अहमदच्या लक्षातही येत नाही. त्यातच त्या रात्रीच्या अंधारात आकाशात ढग दाटून पावसाचे भीतीदायक वातावरण तयार होते. 

अशा या सर्व वातावरणात आणि अंधारात अहमद मित्राचे घर शोधतो का? तो कोकेरला स्वतःच्या घरी कधी आणि कसा पोहचतो? घरी पोहचल्यावर काय होतं? अहमदचा मित्र गृहपाठ वहीत पूर्ण करतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील, तर ‘Where Is The Friend’s home?’ (कुठे आहे मित्राचे घर?) हा सुंदर सिनेमा आवर्जून पाहावा. लहानग्या मुलांचे भावविश्व समजून घेण्यासाठी मोठ्यांना अजून भरपूर प्रवास करावा लागणार आहे, हे अहमदच्या दोन गावांदरम्यानच्या प्रवासातून खूप चांगल्याप्रकारे आपल्या लक्षात येते.

Original title: Khane-ye doust kodjast? Written & directed by Abbas Kiarostami

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *