भीमजयंती साजरी केली म्हणून नांदेडमध्ये दलित युवकाची हत्या

भीमजयंती साजरी केल्यामुळे नांदेडमध्ये दलित युवकाची हत्यामहाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बोंधार हवेली या गावात अक्षय भालेराव या 23 वर्षीय दलित युवकाची गुरुवारी संध्याकाळी निर्घृण हत्या झाली आहे. ह्या हत्येसंदर्भात गावातील मराठा समाजातील 9 तरुणांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून, पैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. FIR मध्ये अ‍ॅट्रोसिटीसह अन्य 16 प्रकारच्या अ‍ॅक्टअंतर्गत  गुन्हे या तरुणांवर नोंदवण्यात आले आहेत.

नांदेडमध्ये दलित युवकाची हत्या

गावातली उच्च जातीय लोकांच्या जातीयवादी मानसिकतेने गेली 40-45 वर्षे दलितांना भीमजयंती साजरी करण्यापासून रोखले होते. मात्र यावर्षीच्या 14 एप्रिलला बौध्द तरुणांनी जातीयवादी दबावाला झुगारून गावात उत्साहाने आंबेडकर जयंती साजरी केली. अक्षय भालेराव हा त्या जयंती महोत्सवाच्या नियोजनात अग्रणी होता. ह्या गोष्टीचा राग गावातल्या काही उच्च जातीय लोकांमध्ये धुमसत होता. 

गुरुवारी संध्याकाळी बोंधार हवेली गावातील मुख्य रस्त्यावरून मराठा समाजातील एक नवरदेवाची लग्नाची वरात चालली होती. त्याचदरम्यान अक्षय भालेराव हा त्याचा भाऊ आकाशसह किराणा मालाच्या दुकानात किराणा खरेदीसाठी गेला होता. वरातीतील काही तरुणांनी अक्षय आणि त्याच्या भावाला पाहिल्यानंतर जातीयवादी शिवीगाळ सुरू केली. ‘भीमजयंती साजरी करता का? पकडा आणि संपवा यांना.’ असं म्हणून वरातीतील काही तरुणांनी अक्षय आणि आकाश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अक्षयवर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे त्याचा हॉस्पिटलमध्ये पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. मारहाणीची बातमी समजताच अक्षयची आई घटनास्थळी पोहचली. अक्षयची आई आणि भाऊ आकाश यांच्यावर दगडफेक करून त्यांनाही काही प्रमाणात मारहाण करण्यात आली. 

नांदेडमध्ये दलित युवकाची हत्याया घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण आहे. गावात आधीपासूनच जातीय तणावाचे वातावरण असल्याचे बौध्द लोकांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वी देखील गावात अ‍ॅट्रोसिटीच्या केसेस घडलेल्या आहेत. बौद्धांच्या घरावर आणि विहारावर दगडफेकीच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच बौध्द स्त्रियांना जातीयवादी आणि अश्लील शिवीगाळ झाल्याच्या घटना देखील पूर्वी घडलेल्या आहेत. 

याच आठवड्यात अ‍ॅट्रोसिटीची आणखी एक घटना घडली आहे, ज्यात एका दलित युवकाला उच्च जातीयांकडून मारहाण झाली आहे. चांगले कपडे आणि गॉगल का घालतोस असे म्हणत या दलित युवकाला मारहाण करण्यात आली. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील मोटा गावात मंगळवारी ही घटना घडली. जिगर शेखलिया असे मारहाण झालेल्या दलित युवकाचे नाव आहे. मंगळवार सकाळी घराबाहेर उभे असताना सात आरोपींपैकी एक जणाने ‘काही दिवसांपासून तू खूपच हवेत राहत आहेस’, असे म्हणत जिगरला जीवे मारण्याची धमकी दिली. तर त्याच रात्री जिगर मंदिराबाहेर उभा असताना सहा आरोपी त्याच्याजवळ आले. ‘तू चांगले कपडे का घालतोस. गॉगल का घातला आहे’, असे म्हणून डेअरी पार्कच्या मागे ओढत नेले आणि मारहाण करण्यात आली. 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *