Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघातात मृतांची संख्या 238 वर, तर 900 हून अधिक लोक जखमी
बालासोर (ओडिशा) – शुक्रवारी सायंकाळी तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघात झाला असून आत्तापर्यंत ह्या ओडिशा रेल्वे अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 900 च्यावर प्रवासी जखमी झाले आहेत. बालासोर जिल्ह्यातील बहानगाजवळ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (12864) या रेल्वेचे डबे रुळावरून घसरुन शेजारच्या रेल्वे रुळावर पसरले होते. हे डबे शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसला (12841) धडकले. त्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे आणखी एका मालगाडीला धडकले. अशा या तीन रेल्वेगाड्यांच्या धडकेत अतिशय भीषण दुर्घटना घडली आहे.
आजवर भारतात झालेल्या भीषण रेल्वे अपघातांपैकी हा एक अपघात आहे. अपघातानंतर रेल्वे डब्यांमध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात अडकले होते. ओडिशा, पश्चिम बंगाल सरकारकडून आपत्ती निवारण दल पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली. तसेच अपघाताची माहिती समजल्यावर स्थानिकांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात धाव घेतली. स्थानिक रहिवाशांनी जखमींवर उपचार चालू असणाऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन स्वतःहून मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. स्थानिकांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या या मदतकार्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी त्यांचे आभार मानले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आदींनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. ओडिशामध्ये आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. सर्व स्तरातून ह्या दुःखद घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक रेल्वे मंत्री आणि रेल्वे विभाग यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभे करत आहे. रेल्वे मंत्र्यांनी मार्च 2022 मध्ये, लाँच केलेल्या ‘कवच’ या रेल्वे सुरक्षा यंत्रणेचे काय झाले? बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (12864) चे डबे रुळावरून घसरल्याची सूचना इतर रेल्वेगाड्यांना वेळेत का मिळाली नाही? यांसारखे प्रश्न विरोधी पक्ष आणि इतर सामान्य लोक सोशल मीडियावर विचारत आहेत.
महाराष्ट्रातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांसमोर या रेल्वे अपघाताविषयी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले,
“ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मृतांचा आकडा 300 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आजवर एवढा मोठा अपघात झाल्याचा देशाने पाहिलेला नव्हता. रेल्वे विभाग आणि केंद्रसरकारने चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करावी. आजवर रेल्वे अपघातानंतर रेल्वे मंत्री राजीनामा द्यायचे, हा आपल्या भारताचा इतिहास आहे. पण आज तर त्याबद्दल कुणी बोलायलाच तयार नाही. एकीकडे वंदे भारत, बुलेट ट्रेन यांसारख्या नवीन वाहतूक सेवा सुरू केल्या जात आहेत. मात्र केंद्र सरकार आणि रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे अधिक महत्व द्यायला हवे.”