भारतीय सिनेमात नवे युग आणणाऱ्या शाम बेनेगल यांची अनोखी कहाणी
शाम बेनेगल हे नाव आताच्या पिढीला कितीसे माहीत आहे याबद्दल शंका यावी अशीच परिस्थिती आहे. पण या डायरेक्टरने ज्याला समांतर सिनेमा म्हटला जातो अशा सिनेमांच्या माध्यमातून कर्तृत्ववान अभिनेत्यांना कित्येक अजरामर सिनेमांच्या माध्यमातून वेगळे व्यासपीठ मिळवून दिले होते. समांतर सिनेमांच्या सुरुवातीच्या प्रवर्तकांपैकी एक हे बेनेगल होते असे म्हणता येते. शाम बेनेगल यांची तुलना करायचीच झाली तर थेट सत्यजीत रे यांच्यासोबत करता येईल. सत्यजित रे हे नाव आज देखील अनेकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. यामागील कारण कदाचित सत्यजित रे यांच्या सिनेमांची प्रचंड झालेली चर्चा आणि त्यांच्या भोवती गुंफले गेलेले अनेक किस्से हे असावे. वास्तविक शाम बेनेगल यांच्यावर सत्यजित रे यांचाच मोठा प्रभाव होता. बेनेगल म्हणत की, संपूर्ण भारतीय सिनेमा दोन भागात विभागता येऊ शकतो, एक म्हणजे सत्यजित रे यांच्या पूर्वीचा सिनेमा आणि दुसरा सत्यजित रे यांच्यानंतरचा सिनेमा. त्यांच्याबद्दल सांगितली जाणारी गोष्ट म्हणजे रे यांचा पाथेर पांचाली सिनेमा बघून त्यांनी सिनेमा बनविण्याचा आपला निर्धार पक्का केला होता. रे यांच्या निधनानंतर बेनेगल यांनीच सर्वात सक्षमरित्या त्यांचा वारसा चालवला आणि त्याला समकालीन संदर्भ प्राप्त करून दिले असे म्हणता येते. रे यांचा प्रभाव असला तरी त्यांनी कुठूनही रे यांची पद्धतीची पुनरावृत्ती केली नाही. त्यांनी स्वतःची वेगळी पद्धत विकसित केली. रे यांच्याबद्दल असलेली कृतज्ञता त्यांनी त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवुन दाखवून दिली होती.
सिनेनिर्माते गुरुदत्त यांचे भाचे असलेले शाम बेनेगल यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 रोजी हैदराबाद येथे झाला होता. शाम बेनेगल यांनी सिनेक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी कुठले अधिकृत शिक्षण घेतले नव्हते. त्यांचा प्रवास हा खऱ्या अर्थाने वळणा वळणांचा राहिला आहे. अर्थशास्त्रात एमए करून ते फोटोग्राफीकडे वळले होते यावरून या गोष्टीला दुजोरा देता येईल. त्यांना लहानपणी पेंटर बनायचे होते. पण त्यांच्यात सिनेमा बनविण्याची जी इच्छा घुसली ती शेवटपर्यंत सुटली नाही. त्यांच्या वडिलांच्या प्रोफेशनल कॅमेऱ्यातून हळूहळू शिकत त्यांनी एक छोटा सिनेमा बनवला होता. बेनेगल यांचा सिनेमाक्षेत्रातील प्रवासात त्यांचा सर्वात मोठा आधार होता ते म्हणजे पुस्तके. पुस्तकांनी त्यांना दिशा दिली, ज्यांच्या आधारे ते वेगळ्या विषयाला वाहून घेतलेले सिनेमे तयार करू शकले. सुरुवातीला काही काळ त्यांनी जाहिरातींसाठी पटकथा लिहिण्याचे देखील काम केले आहे. सामान्य माणसाच्या मनोरंजनाचा अंदाज होता. त्यांनी आपले सिनेमे नेहमी यथार्तवाद आणि हवेत उड्या मारून ‘फ्याटिंग’ करणाऱ्या हिरोच्या मध्ये ठेवले.
बेनेगल यांनी आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्यावर प्रचंड टीका केली होती, पण इंदिरा गांधी या बेनेगल यांच्या सिनेमांबद्दल म्हणाल्या होत्या की, ‘बेनेगल यांचे सिनेमे मनुषत्वाला मनुष्यत्वाच्या मूळ रुपात शोधत असतात.’ बेनेगल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर एक डॉक्युमेंटरी देखील तयार केली होती. शाम बेनेगल यांचे सिनेमे दिर्घकालीन परिणाम करणारे ठरले आहेत. त्यांचे बहुतांश सिनेमे हे सोशल पॉलिटिकल कमेंट्री यात मोडतात. तरी देखील बेनेगल या विषयाबाबत स्पष्ट मत ठेऊन होते. ते म्हणत की, राजकीय सिनेमे तेव्हाच चालू शकतात, जेव्हा स्वतः समाज तशी मागणी करेल. मला असे नाही वाटत की, सिनेमे सामाजिक स्तरावर खूप मोठा बदल घडवून आणतात, पण एक मात्र निश्चित आहे की त्यांच्यात गंभीररीत्या सामाजिक चैतन्य जागृत करण्याची क्षमता असते.’ बेनेगल यांच्या सिनेमांकडे बघितले तर याच गोष्टीचा अनुभव येतो. मंथन, अंकुर, निशांत, हरी भरी, समर, आरोहण, सुस्मन या सिनेमांच्या माध्यमातून ते निरंतर सामाजिक चैतन्य जागृत करण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. स्वातंत्र्यानंतर भारतीय सिनेमात अनेक प्रयोग झाले. एखादा सिनेमा चालला तर त्या सिनेमाची थीम ही जोपर्यंत लोक कंटाळत नाहित तोवर उचलून धरली जात असे. तरी देखील स्वातंत्र्यानंतर भारतीय सिनेमा हा मोठ्या प्रमाणावर सामाजिक झाला. 70- 80 च्या दशकापर्यंत भारतीय सिनेमा हा कमर्शियल आणि समांतर अशा दोन भागात वाटला गेला होता. या काळात अनेकांनी दोन्ही प्रकारचे सिनेमे करण्याचा प्रयत्न करून पाहिला. तर काही आपापल्या कोशात काम करत राहिले. समांतर सिनेमांमध्ये मनोरंजन हा विषय नसे. बेनेगेल यांच्याच शब्दात सांगायचे तर हे सिनेमे फक्त लोकांचे चैतन्य जागृत करण्यासाठी बनविण्यात येत असत. बेनेगल तेव्हापासून तर आजपर्यंत जे लोक सिनेमांना लोकांचे चैतन्य जागृत करण्याचे साधन मानतात त्यांचे पथदर्शक आहेत असे म्हणता येते.
बेनेगल यांनी भारतीय सिनेक्षेत्राला पुढील काळात लेजेंड झालेले अभिनेते दिले. नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आजमी, स्मिता पाटील, अमरीश पुरी, अनंत नाग यांचा त्यात समावेश करता येऊ शकतो. अमरीश पुरी यांनी त्यांच्या ‘ऍक्ट ऑफ लाईफ’ नावाच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की ‘शाम एक चालते फिरते विश्वकोश आहेत.’ बेनेगेल यांच्याबद्दल लिहित असताना त्यांनी दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केलेली ‘भारत एक खोज’ मालिका विनाउल्लेख राहू शकत नाही. जवाहरलाल नेहरूंच्या असामान्य पुस्तकावर आधारित या मालिकेने भारताचा पुरातन इतिहास अभिनव पद्धतीने जगासमोर मांडला होता. आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात त्यांनी ‘वेलकम टू सज्जनपूर ‘ सारखा सिनेमा बनवून दर्शकांना पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीच्या सिनेमाची चव चाखायला दिली होती.
बेनेगल हे आपल्या आपल्या सिनेमांसाठी 5 राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे एकमेव दिग्दर्शक आहेत. भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन त्यांना 1991 साली पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. तसेच 2007 साली देखील सिनेसृष्टीतील सर्वश्रेष्ठ दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.
